BMWनं अपघात, प्रेयसीच्या घरी आश्रय, ४० कॉल, शहापुरात मुक्काम; पोलिसांना मिहीर कसा सापडला?

मुंबई: वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहाला अखेर काल अटक झाली. जवळपास ६० तास तो पोलिसांना चकवा देत होता. रविवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास मिहीरच्या बीएमडब्ल्यूनं वरळीत एका दुचाकीला धडक दिली. त्या दुचाकीवर एक दाम्पत्य होतं. यातील महिलेचा अपघातात मृत्यू झाला, तर तिचा पती थोडक्यात वाचला. अपघात झाल्यापासून फरार असलेल्या मिहीरला मंगळवारी संध्याकाळी विरारमधून अटक करण्यात आली.

वरळीत अपघात झाल्यानंतर मिहीरनं त्याची कार सी लिंकच्या दिशेनं दामटवली. सी लिंकनं तो वांद्र्यातील कलानगरला आला. त्यानं कार तिथेच सोडली आणि गोरेगावात राहणाऱ्या प्रेयसीचं घर गाठलं. तिथे तो सकाळी आठ वाजेपर्यंत होता. प्रेयसीच्या घरी पोहोचण्यापूर्वी त्यानं बहिणीला कॉल केला होता. तिच्या फोनवरुनच तो आईशी बोलला. त्यानंतर त्याची बहीण आणि आई गोरेगावला आले. त्यानंतर ते शहापूरच्या दिशेनं गेले. एक दिवस शहापूरमध्ये थांबल्यानंतर मिहीर विरारला गेला. त्याची आई आणि बहीण पुन्हा घरी आले. मिहीर विरारमध्ये त्याच्या मित्राच्या मोबाईलचा वापर करत होता.
Mumbai Hit and Run Case: हिट अँड रननंतर मिहीरचा वडिलांना फोन; राजेश शहा सव्वा तासात घटनास्थळी; तपासातून माहिती समोर
मिहीर आणि त्याची प्रेयसी यांच्यामध्ये अपघातानंतर ४० वेळा संभाषण झालं. तो अपघातानंतर प्रेयसीच्या घरी २ तास झोपला होता. मिहीरची बहीण पूजा आणि मिहीरची प्रेयसी या दोघी व्यावसायिक भागीदार आहेत. रविवारच्या संध्याकाळी मिहीर, त्याची आई, बहीण पूजा आणि त्याचा एक मित्र दोन कारमधून शहापुरातील रिसॉर्टला रवाना झाले. सोमवार संध्याकाळपर्यंत ते सोबत होते. त्यानंतर मिहीर निघून गेला.
Mumbai Hit and Run: …तर माझी कावेरी वाचली असती हो! पतीचा काळीज पिळवटून टाकणारा टाहो; आक्रोश ऐकून उपस्थित सुन्न
मिहीर शहा त्याच्या मित्राच्या फोनचा वापर सातत्यानं करत होता. मध्ये मध्ये तो फोन स्विच्ड ऑफ करायचा. पोलिसांनी मित्राचा नंबर ट्रॅक करण्यास सुरुवात केली. मंगळवारी सकाळी मित्रानं फोन ऑन केला आणि पोलिसांनी त्याचं लोकेशन ट्रेस केलं. त्यानंतर पोलिसांचं एक पथक विरार फाटा येथील एका रिसॉर्टला पोहोचलं. त्यांनी मिहीरला अटक केली.

वरिष्ठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ वर्षीय मिहीर रविवार सकाळपासून पोलिसांना गुंगारा देत होता. त्याला विरारमधून अटक करण्यात आली. त्याआधी त्याच्या आई आणि दोन बहिणींना ठाण्यातील शहापुरातून चौकशीसाठी मुंबईला नेण्यात आलं होतं. त्यांनी पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आलं. हाच दबाव पोलिसांच्या कामी आला आणि मिहीरला अटक करण्यात त्यांना यश आलं.