सर्वाधिक तुटवडा ‘बी’ आणि ‘ए’ पॉझिटिव्ह
पावसाळ्याचे दिवस असल्याने रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाली असून, रक्त आणि प्लेटलेट्सच्या मागणीत ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे शहरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याचे विविध रक्तपेढी संचालकांनी सांगितले. सध्या सर्वाधिक तुटवडा ‘बी’ आणि ‘ए’ पॉझिटिव्ह रक्तगटाचा आहे. ससून रुग्णालयातील रक्तपेढीत ‘बी’ पॉझिटिव्ह रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे जवळपास १५ रुग्णांना ‘बी’ पॉझिटिव्ह रक्तगटाचे रक्त बाहेरून आणावे लागले आहे. अशीच स्थिती शहरातील खासगी रक्तपेढ्यांची झाल्याने रक्तदान करण्याचे आवाहन रक्तपेढ्यांनी केले आहे.
डेंगीच्या रुग्णांमध्ये वाढ
भारती विद्यापीठ रुग्णालय रक्तपेढीतील अधिकाऱ्यांनी सांगितले, की सध्या सर्वच रक्तगटांचा तुटवडा जाणवत आहे. डेंगीच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने प्लेटलेट्सची सर्वाधिक मागणी होत आहे. मागणी जास्त आणि साठा कमी असल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. जनकल्याण रक्तपेढीतील अधिकाऱ्यांनी सांगितले, की ‘ओ’ आणि ‘एबी’ पॉझिटिव्ह या रक्तगटाचे रक्त उपलब्ध आहे. मात्र, ‘ए’ आणि ‘बी’ पॉझिटिव्ह रक्तगटाचा तुटवडा जाणवत आहे. महापालिका आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात १३ जुलैपर्यंत डेंगीचे २१६ संशयित रुग्ण आढळले असून, यातील पाच रुग्णांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
डेंगी, चिकनगुनिया, करोना, झिका या आजारांचे रुग्ण सध्या आढळत आहेत. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा डेंगी आणि चिकनगुनियाच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. डेंगीच्या काही रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे दिसतात. झिका विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी गर्भवती महिलांनी काळजी घेणे आवश्यक आहे.- डॉ. परीक्षित प्रयाग, संसर्गजन्य रोग तज्ज्ञ
गेल्या काही दिवसांपासून रक्त आणि प्लेटलेट्सची मागणी वाढली आहे. सध्या ‘ए’ आणि ‘बी’ या रक्तगटाचा तुटवडा जाणवत आहे. पावसाळ्यामुळे शिबिरांची संख्या घटल्याने तुटवडा जाणवत आहे. गंभीर स्थिती निर्माण होऊ नये; म्हणून शिबिर आयोजित करण्यात आले आहे.- डॉ. अतुल कुलकर्णी, संचालक, जनकल्याण रक्तपेढी
तुटवडा निर्माण होण्याची कारणे
– सर्वच रक्तगटांच्या मागणीत वाढ.
– शिबिरांच्या संख्येत घट.
– कीटकजन्य आजारांचे वाढलेले रुग्ण.
– प्लेटलेट्सच्या मागणीत वाढ.