Blood Donation Day : रक्तदानात पुणेकर अव्वल; तर मुंबईचा दुसरा क्रमांक, वर्षभरात राज्यात २०.४४ लाख युनिट रक्तसंकलन

प्रतिनिधी,मुंबई : रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले जाते. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत हे श्रेष्ठ दान करण्यात पुणेकर अव्वल स्थानी आहेत, तर मुंबईकर दुसऱ्या क्रमाकांवर आहेत. राज्यातील एकूण रक्तदानापैकी सुमारे ३२ टक्के रक्तदान पुणे आणि मुंबईत झाल्याचे मागील वर्षीच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.सन २०२३मध्ये राज्यातील एकूण ३५ जिल्ह्यांमध्ये ३३ हजार ८०७ शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये एकूण २० लाख ४४ हजार ९५७ युनिट रक्तदान करण्यात आले. यापैकी ९९.५८ टक्के रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. पुण्यातून सर्वाधिक, म्हणजेच तीन लाख ४६ हजार ४५० युनिट रक्तदान करण्यात आले, तर मुंबईत तीन लाख १० हजार १४६ युनिट रक्तदान करण्यात आले.

शहरात पुन्हा प्रीपेड रिक्षा प्रयोगाचा प्रस्ताव? का फसली होती प्रीपेड मिटर योजना ? आरटीए बैठकीत होणार निर्णय
राज्यात दररोज सरासरी चार हजार युनिट रक्ताची आवश्यकता असते. त्या तुलनेत रक्तदान कमी होते. राज्यात रोज सरासरी पाच हजार ६०२ युनिट रक्तदान केले जाते. यापैकी काही युनिट रक्ताचा वापर न झाल्यामुळे ते वाया जाते. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रक्तदानामध्ये महाराष्ट्र हा देशामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यात ३८२ रक्तपेढ्या आणि ३६१ साठवणूक केंद्रे आहेत.

जनजागृती गरजेची

सुरक्षित रक्त आणि रक्तघटक उपलब्ध व्हावेत, यासाठी सामान्यांमध्ये जनजागृती करणे, त्यांना विनाशुल्क रक्तदान करण्यासाठी प्रवृत्त करणे, रक्तदानाच्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

दाते वाढवण्याची गरज

पावसाळी दिवसांमध्ये रक्तदानाची अधिक गरज भासते. साथीच्या आजारांमध्ये रुग्णांना रक्त; तसेच प्लेटलेट द्याव्या लागतात. रक्त तसेच रक्तघटक उपलब्ध करण्याच्या दृष्टीने दात्यांची साखळी वाढवणे गरजेचे आहे. मात्र सातत्याने प्रयत्न करूनही दात्यांची संख्या म्हणावी तितकी वाढलेली नाही. योग्य नियोजन, रक्ताची उपलब्धता व गरज लक्षात घेऊन त्यादृष्टीने रक्तसंकलन करण्यासाठी योग्य प्रकारे वैद्यकीय नियोजन करण्याची गरज रक्तदान मोहिमेतील आरोग्य कार्यकर्ते ऋषी साबळे यांनी व्यक्त केली.

आकडेवारीवर नजर

राज्यभरातून रक्तसंकलन : २० लाख ४४ हजार ९५७ युनिट

पुणे : ३ लाख ४६ हजार ४५० युनिट

मुंबई : ३ लाख १० हजार १४६ युनिट