बाहेरगावाहून पुण्यात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने अनेकदा रक्ताचा तुटवडा निर्माण होतो. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रक्तपेढीचे रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. शंकर मोसळगी यांनी सांगितले, की दर वर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत रक्ताचा तुटवडा निर्माण होतो. सध्या दोन ते चार दिवसांएवढाच रक्तसाठा शिल्लक आहे. मात्र, शिबिरांचे नियोजन केल्याने तुटवडा निर्माण होणार नाही.
नवी पेठेतील इंडियन सीरॉलॉजिकल इन्सिट्यूट (आयएसआय) रक्तपेढीने सांगितले, की उन्हाळ्यात रक्तदान शिबिर होत नसल्याने तुटवडा जाणवत आहे. शिबिर आयोजित करण्यासाठी संस्था, संघटनांना संपर्क करण्यात येत आहे.
उन्हाळ्यात यामुळे निर्माण होते टंचाई
– उन्हामुळे रक्तदान करणाऱ्यांची संख्या घटते.
– सुट्ट्यांमुळे शिबिरांची संख्या कमी होते.
– नियोजित शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढते.
– बाहेरगावाहून पुण्यात उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक.
गेल्या काही दिवसांत रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे रक्त संकलनावर परिणाम झाला असून, सद्यस्थितीत २५० पिशव्यांचा साठा उपलब्ध आहे. हा साठा पुढील पाच ते सहा दिवस पुरणार आहे. येत्या काही दिवसांत शिबिर आयोजित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
– डॉ. सोमनाथ खेडकर, प्रमुख, ससून रक्तपेढी
आठ दिवसांचा रक्तसाठा उपलब्ध आहे. आगामी काळात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये; म्हणून शिबिर आयोजित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. खासगी कंपन्या, गृहनिर्माण सोसायट्या, सामाजिक संस्थांशी संपर्क करण्यात येत आहे.
– किशोर धुमाळ, केईएम रुग्णालय रक्तपेढी
सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्तपेढ्यांनी रुग्णांना रक्त उपलब्ध करून दिले पाहिजे. रक्तपेढ्यांनी रक्ताचा तुटवडा असतानाच नाही, तर नेहमीच रक्तदात्यांना योग्य वागणूक देणे आवश्यक आहे. नियमित शिबिरांचे आयोजन करणे आवश्यक आहे.
– राम बांगड, अध्यक्ष, रक्ताचे नाते ट्रस्ट