शिर्डी : राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणविस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे भाजप नेते डॉ.राजेंद्र पिपाडा हे आज काँग्रेस नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या आश्वी येथिल एका कार्यक्रमात एकाच व्यासपिठावर दिसून आल्याने राजकिय चर्चांना उधान आले असून विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर असे चित्र दिसु लागल्यामुळे अनेकांच्या भुवय्या उंचावल्या आहेत. त्यामुळे शिर्डी विधानसभा निवडणुकीत गणित बदणार का ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
राजेंद्र पिपाडा शिर्डीतील भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. भाजपकडे उमेदवारीची मागणी केल्यानंतर आज ते थोरात यांच्या समवेत दिसले. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील आश्वी गावात महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या सत्कार समारंभाला राजेंद्र पिपाडा हे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह एकाच व्यासपीठावर दिसून आले. त्यामुळे पिपाडा भाजपची साथ सोडणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
२००९ मध्ये शिर्डी विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात शिवसेना भाजप युतीकडून राजेंद्र पिपाडा यांनी निवडणुक लढवली होती. त्या निवडणुकीत काटे टक्कर झाली होती. त्यानंतर राजेंद्र पिपाडा हे शिवसेनेतून भाजपात गेले होते. त्यानंतर विखे पाटील भाजपामध्ये आले. पिपाडा हे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती मानले जातात. त्यांनी २०२४ ची विधानसभा निवडणूक भाजपकडून लढवण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे.
या दरम्यान राजेंद्र पिपाडा यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यावर टीका केली होती. विखे पाटील मोक्कातील आरोपींच्या कार्यालयाचे उद्घाटन करत असून आरोपींना पाठबळ देत असल्याचे आरोप करताना त्यांनी संपूर्ण प्रकरण निदर्शनास आणून विखेंवर टीका केली होती.
या निमीत्ताने पिपाडा भाजप सोडून कॉंग्रेसमध्ये जात आहेत का ? विखे आणि पिपाडा यांच्यामध्ये पक्षांतर्गत धुसफुस आहे का ? विधानसभेच्या निवडणुकीत पिपाडा विखेंच्या विरोधात दंड थोपाटणार का ? असे अनेक प्रश्न पडलेले आहे. अशा वेगवेगळ्या राजकीय चर्चाचे ऊधान आले आहे.