वापरा आणि फेकून द्या ही भाजपची भूमिका, काम संपलं की लाथा घालतात – संजय राऊत कडाडले

संजय राऊतांची भाजपवर टीकाImage Credit source: tv9

26 तारीख उलटून गेली, विधानसभेची मुदत उलटून गेली आहे. तीन पक्षांच्या आघाडीला ( महायुती) सैतानी बहुमत मिळालं आहे. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला ( मित्रपक्ष वगैरे पकडून) साधारण 140 जागा मिळाल्या आहेत. तरीही जर राज्याला मुख्यमंत्री लाभला नसेल तर भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट) यांचं तंगड्यात तंगडं अडकलं आहे. आणि पडद्यावर एकमेकांच्या छातीवर बसण्याचा कार्यक्रम सुरू आहे.

अशी टीका शिवसेना ( ठाकरे गट) खासदार संज राऊत यांनी केली. दिल्लीचे जे शूरवीर आहेत, भाजपचे नेतृत्व, त्यांनी डोळे वटारले की आत्तापर्यंत सगळे गप्प बसत होते. पण त्यांनी महाराष्ट्रामध्ये जे बंडखोर, जी भुतं निर्माण केलीत ती आता त्यांच्या वटारलेल्या डोळ्यांना पाहून गप्प बसत नाहीत. ते मोदी आणि शहानांच आव्हान देत आहेत असंही दिसतंय. महाराष्ट्रात सरकार कधी, मुख्यमंत्री कधी येतील याची सगळ्यांनाच अपेक्षा आहे.

गरज सरो आणि वैद्य मरो 

लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाने एकनाथ शिंदेंना शब्द दिला होता की ( विधानसभा ) निवडणुकीत तुमच्या कितीही जागा आल्या तरी मुख्यमंत्री पद तुम्हाला दिलं जाईल, अशी चर्चा होती. त्यावरही संजय राऊत यांनी सडेतोड शब्दांत उत्तर दिलं. भारतीय जनता पक्षाचा शब्द गांभीर्याने घ्यायचा नसतो. गरज सरो आणि वैद्य मरो, वापरा आणि फेका हीच भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे. त्यांनी दिलेल्या शब्दानंतर, शब्द फिरवल्यानंतर महाराष्ट्राच राजकारण कसं फिरलं हे सर्वांनांच माहीत आहे. फिरवलेल्या शब्दाचे सर्वात मोठी व्हिक्टीम, बळी ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आहे.भारतीय जनता पक्ष कधीच शब्द पाळत नाही. मग तो शब्द खुलेआम दिलेला असो, बंद दाराआड दिलेला असो, हिंदुहृदयस्रमाट बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत दिलेला असो, पंतप्रधानांसमोर दिलेला असो किंवा अमित शाहांच्या कार्यालयात दिलेला असो… ते शब्द कधीच पाळत नाहीत असे म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्रीपदावरून भाजपने उद्धव ठाकरेंना दिलेल्या शब्दाची आठवण करून देत टीकास्त्र सोडलं.

त्यांना एखादा पक्ष फोडण्यासाठी, सरकार पाडण्यासाठी जेव्हा एखाद्याची गरज असते, तेव्हा ते आश्वासनं आणि वचनांची बरसात करतात. आणि त्यांचं काम झालं की ते सरळ लाथा घालतात, अशा शब्दांत राऊतांनी भाजपावर निशाणा साधला.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)