राम शिंदे यांचा वेगळाच तर्कImage Credit source: टीव्ही ९ मराठी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल 12 एप्रिल रोजी रायगडाला भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्त शाह यांनी आदरांजली वाहिली. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह दिग्गज नेते हजर होते. छत्रपती घराण्यातील उदयनराजे भोसले उपस्थित होते. पण संभाजीराजे उपस्थित नसल्याने चर्चेचा विषय ठरला. त्यांना निमंत्रणच दिले नसल्याचे कारण समोर आले. त्यांनी अजून या विषयावर प्रतिक्रिया दिलेली नाही. संभाजीराजे छत्रपती हे रायगड विकास प्राधिकारणाचे प्रमुख असताना, त्यांनाच कार्यक्रमासाठी डावलण्यात आल्याची चर्चा राज्यात सुरू झाली. त्यातच विधान परिषदेचे सभापती आणि भाजप नेते राम शिंदे यांनी याविषयी जो तर्क दिला त्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.
राम शिंदे हे काय बोलून गेले?
राम शिंदे हे नांदेड येथील दौर्यावर असताना त्यांना माध्यमांनी रायगडावरील कार्यक्रमात संभाजीराजे यांना निमंत्रण नसल्याविषयी प्रश्न केला. त्यावर त्यांनी वेगळाच तर्क मांडला. रायगडावर देशाचे गृहमंत्री, मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अतिशय मोठ्या उत्सवाच्या वातावरणात कार्यक्रम झाला, असे शिंदे सर म्हणाले.
या कार्यक्रमाला उदयन महाराज होते. त्यामुळे संभाजी महाराजांना सांगितलं का नाही हे मला माहित नाही. परंतू उदयन महाराज थोरल्या घराण्याचे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याचे वंशज आहेत, असा अजब तर्क राम शिंदे यांनी दिला. मला वाटते या संदर्भात मीडिया ट्रायल करण्याची कोणतीही आवश्यकता नाही छत्रपती शिवाजी महाराज तुमच आमचा सर्वांच दैवत आहे त्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहिले पाहिजे, असे शिंदे म्हणाले.
मराठी पाठशाळा उपक्रम
मराठी पाठशाळा या उद्धव ठाकरे गटाच्या उपक्रमावर ही त्यांनी प्रतिक्रिया दिली. मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे, त्यांनी सुरू केले असेल तर दुसर्याने सुरू करायला हरकत नाही तिसर्यांनी सुरू करायला हरकत नाही सर्वांनी मराठी भाषेचा अवलंब केला पाहिजे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला असल्याच्या कारणाने सर्वांचीच आपली मराठी भाषा ही मातृभाषा आहे. त्यांनी जे प्रोत्साहन दिले ते जरा अजून लवकर दिल असता तर चांगलं झालं असतं, असे ते म्हणाले.
…आणि मग इकडं पगार सुरू झाला
विनाअनुदानित शिक्षकांची परिस्थिती बघून मी नोकरी सोडली, राजकारणात आलो.. आता इकडे पगार चालू झाला असे मिश्किल भाष्य राम शिंदे यांनी केले. विनाअनुदानित शिक्षकांना अगदी थोडा पगार दिला जातो, अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, मी देखील त्याचा लाभार्थी आहे.. ही सगळी परिस्थिती बघून मी चार वर्षात नोकरी सोडली, राजकारणात आलो आणि मग इकडे पगार सुरू झाला, असे मिश्किल वक्तव्य विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केलं आहे. शिर्डी येथे आयोजित क्रीडा शिक्षकांच्या राज्यस्तरीय अधिवेशनात बोलताना शिंदे यांनी विना अनुदानित शिक्षकांच्या प्रश्नांवर भाष्य करत शासनाने योग्य धोरण राबवले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
म्हणून सभागृह कंट्रोलमध्ये राहतं
सभापती असताना देखील तो एका वर्गाचा भाग होता. शाळेतील विद्यार्थी सराईत नसतात मात्र आमच्या वर्गातले विद्यार्थी खूप सराईत आहेत. त्यामुळे त्यांना कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळ्या आयुधांचा अधिकार माझ्याकडे आहे. स्टेप बाय स्टेप त्यांचा वापर करतो म्हणून सभागृह कंट्रोल मध्ये राहते, असा मिश्किल टोला त्यांनी हाणला.
रोहित पवार यांच्यावर टीका
स्वत:ला नाचता आले नाही तर अंगण वाकड म्हणणं योग्य होणार नाही, असा टोला राम शिंदे यांनी रोहित पवार यांना लगावला. आपली माणसं आपण चांगली सांभाळली असती तर अशी परिस्थिती झाली नसती. मी लोकात राहणारा आणि लोकांचं ऐकणार माणूस आहे. माझ्याकडे आल्यावर मदत करणे हे माझे कर्तव्य, असे ते म्हणाले.