राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं 231 जागांवर दणदणीत विजय मिळवला. त्यामध्ये भाजपनं 132 जागा जिंकल्या तर शिवसेना शिंदे गटानं 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटानं 41 जागांवर विजय मिळवला. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीला तीनही पक्ष मिळून केवळ 50 जागाच जिंकता आल्या, त्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दहा जागा, शिवसेना ठाकरे गटाच्या 20 जागा आणि काँग्रेसच्या 16 जागांचा समावेश आहे.
राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला. पाच डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. अखेर आज मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. भाजपकडून यावेळी मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे, तर काही अनुभवी लोकांचा पत्ता कट करण्यात आला आहे. भाजपकडून 19 मंत्र्यांनी आज शपथ घेतली.
नव्या चेहऱ्यांना सधी
भाजपकडून यावेळी नितेश राणे, शिवेंद्रसिंह भोसले, पंकज भोईर, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ,आकाश फुंडकर, जयकुमार गोरे यांच्यासह काही जणांना प्रथमच मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे.
भाजप मंत्र्यांची संपूर्ण यादी
गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, जयकुमार रावल, नितेश राणे, शिवेंद्रसिंह भोसले, पंकज भोईर, गणेश नाईक, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ, अतुल सावे, संजय सावकारे, आकाश फुंडकर, अशोक उईके, जयकुमार गोरे