बिग बॉस विजेता सूरज चव्हाणला घर कधी मिळणार? अजित पवार यांनी पाहणी करत थेट सांगितले मी शब्दाचा पक्का…

अजित पवार, सूरज चव्हाणImage Credit source: TV 9 Marathi

Suraj Chavan and Ajit Pawar : बारामती तालुक्यातील मोढवे गावातील सूरज चव्हाण सोशल मीडियाचा स्टार आहे. परंतु बिग बॉस मराठी सिझन पाचमध्ये विजेतेपद मिळाल्यानंतर तो सुपरस्टार झाला. त्याला विजेतेपद मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी त्याला घर देण्याचे आश्वासन दिले होते. विजेतेपदानंतर अजित पवार यांची सूरज चव्हाण याने भेट घेतली होती. त्यावेळी अजित पवार यांना सूरज चव्हाणकडे घर नसल्याचे समजले. अजितदादांनी लागलीच त्याला घर देण्याची सूचना केली. आता रविवारी ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर असलेल्या अजित पवार यांनी सूरज चव्हाण याच्या गावी जाऊन त्याच्या घराच्या कामाचा प्रगतीचा आढावा घेतला.

दिवाळीपर्यंत घर मिळणार

उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर होते. बारामती तालुक्यातील पाणी पुरवठा योजनेची पाहणी करण्यासाठी ते आले होते. यावेळी ते रस्त्यावर असलेल्या सूरज चव्हाण याच्या गावात दाखल झाले. त्यांनी सूरज चव्हाण याच्या घराच्या बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. ठेकेदारास बोलवून घर कधी पूर्ण होणार? अशी विचारणा केली. त्यावेळी दिवाळीपर्यंत सूरज चव्हाण स्वत:च्या घरात जाणार असल्याचे त्या ठेकेदाराने अजित पवार यांना सांगितले.

काय म्हणाले अजित पवार?

यावेळी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना अजित पवार म्हणाले, मी शब्दाचा पक्का आहे. जे सांगितले ते करतोच. हे लोकांना माहीत आहे. परवाच मला सूरज चव्हाण भेटला होता. त्याने घराचे काम सुरु असल्याचे सांगितले होते. आता दिवाळीच्या आधीच त्याला त्याचे घर मिळणार आहे. ग्रामीण भागातील व्यक्तीला संधी मिळाली की तो पुढे जाऊ शकतो. हे सूरज चव्हाण याने दाखवून दिले. तो चांगले प्रयत्न करत आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

सूरज चव्हाण याच्या ‘झापुक झुपुक’ सिनेमाबद्दल अजित पवार यांनी त्याला शुभेच्छा देखील दिल्यात. दोन दिवसांपूर्वी मंत्रालयाध्ये सूरज चव्हाण याने अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी सूरज चव्हाण याने अजित पवार यांना घराच्या कामाची प्रगती सांगितली होती. त्यानंतर अजित पवार स्वत: त्याच्या घराची पाहणी करुन गेले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)