मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटातून शिवसेनेत इनकमिंग सुरूच आहे. धुळ्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडलं आहे. आज धुळ्याचे शिवसेना ठाकरे गटाचे सह संपर्क प्रमुख हिलाल माळी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी आपल्या हजारो समर्थकांसह एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ठाण्यात शिवसेनेत प्रवेश केला. हा धक्का ताजा असतानाच आता उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसला आहे.
पालघरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडलं आहे. पालघरच्या माजी नगराध्यक्षा प्रियंका पाटील , माजी उप नगराध्यक्ष रवींद्र पाटील, माजी नगरसेविका दीपा पामाळे, शिवसेना ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख प्रवीण पाटील आणि युवा एल्गार संघटनेचे अध्यक्ष विराज गडग यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ठाण्यातील टेंभी नाका येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. हा शिवसेना उद्धव ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. यावेळी खासदार नरेश म्हस्के, संपर्क प्रमुख रवींद्र फाटक, पालघर जिल्हाध्यक्ष कुंदन संख्ये यांची देखील उपस्थिती होती.
धुळ्यातही धक्का
दरम्यान दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाला आज धुळ्यातही मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सह संपर्क प्रमुख हिलाल माळी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हिलाल माळी यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. हा उद्धव ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. हिलाल माळी यांचा धुळे शहरासह ग्रामीण भागात मोठा जनसंपर्क आहे.
हिलाल माळी यांच्यासह उपजिल्हाप्रमुख, उपमहानगर प्रमुख पंचायत समिती सदस्य माजी नगरसेवक अशा अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. हिलाल माळी यांच्या पक्षप्रवेशामुळे धुळे ग्रामीणमध्ये शिवसेनेला मोठं बळ मिळाल्याचं बोललं जात आहे. धुळे ग्रामीणची उमेदवारी न मिळाल्याने हिलाल माळी शिवसेना ठाकरे गटावर नाराज होते, अखेर त्यांनी आता शिवसेनेत प्रवेश केला आहे.