Bhushi Dam: १० मिनिटांचा पाऊस अन् अन्सारी कुटुंब संपलं, बचावकार्य करणाऱ्यांनी कारण सांगितलं

मुंबई: लोणावळ्यात रविवारी भुशी डॅमच्या बॅक वॉटर येथे बुडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. अन्सारी यांचं हे कुटुंब लोणावळ्याच वर्षाविहारासाठी आलेलं होतं. मात्र, त्यांना या ठिकाणाबाबत कुठलीही माहिती नव्हती. त्यात त्यांनी पाण्यात उतरण्यासाठी अशी जागा निवडली जिथे कोणीही जायला बघत नाही आणि तिथेच घात झाला. पाण्याच्या प्रवाहात दहा जण वाहून गेले.

जिथे अन्सारी कुटुंब थांबलेलं तिथे तीन धबधब्यांचं पाणी येतं

भुशी डॅम परिसरातील ज्या ठिकाणी अन्सारी कुटुंब पाण्यात भिजण्यासाठी उतरलं तिथे तीन धबधबे आहेत. तिथे तीन धबधब्यांचं पाणी एकत्र येत भुशी डॅममध्ये जाऊन मिळतं. त्यामुळे येथे जास्त कोणी जायला बघत नाही. मात्र, जागा नवीन असल्याने अन्सारी कुटुंबाला याबाबत माहिती नव्हती. रविवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास हे लोक भुशी डॅम परिसरात आले. तिथे लहान मुलांसह १० जण पाण्यात उतरले. ते लोक पाण्यात उतरुन अवघे १० मिनिटं झाले असतील आणि पाण्याची पातळी अचानक वाढली. कारण, धबधबे असलेल्या भागात त्याच काळात प्रचंड प्रमाणात पाऊस झाला.
Pune News: भुशी डॅम दुर्घटनेनंतर ताम्हिणी घाटात तरुण वाहून गेला, अंगावर काटा आणणारा VIDEO

पाण्याची पातळी अचानक वाढली अन् ते अडकले

पाण्याची पातळी वाढली आणि प्रवाह देखील वाढला. अन्सारी कुटुंबाला काही कळेल त्यापूर्वीच ते पाण्यात अडकले. त्यांनी एकमेकांना घट्ट धरु ठेवलं. बाहेरुन काहींनी त्यांची मदत करण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र, त्यांच्यापर्यंत मदत पोहोचेल त्यापूर्वीच त्यांच्यातील एक महिला लहान मुलासह वाहून गेली. ती वाहून गेल्यानंतर या सर्वांचाही तोल गेला आणि सगळेच वाहून गेले. त्यानंतर ज्यांना पोहता येत होतं ते स्वत:ला वाचवून बाहेर आले, तर इतर तिघांना वाचवण्यात आलं. त्यातील एका मुलीच्या हृदयाचे ठोके बंद झाले होते. तेव्हा तिथेच वर्षासहलीला आलेल्या दोन डॉक्टरांनी तिला सीपीआर देत वाचवलं. तर पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. त्यापैकी एकाचा मृतदेह अद्यापही सापडलेला नाही.

कुटुंब वाहून जातानाचा धडकी भरवणारा व्हिडिओ

बचावकार्य करणाऱ्यांनी काय सांगितलं?

बचावकार्य करणऱ्यांनी त्यादिवशीचा थरार सांगितला आहे. हे कुटुंब पाण्यात भिजण्याचा आनंद घेत असताना मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या ठिकाणी जरी १५ मिनिटं पाऊस पडला तरी धबधब्याचं पाणी प्रचंड वाढतं. कुटुंबाला या पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली. वाहून गेलेल्या सर्वांचे मृतदेह आम्हाला भुशी डॅमच्या बॅकवॉटरमध्ये सापडल्याचंही त्यांनी सांगितलं.