Bhushi Dam: कुटुंबासह वाहून गेली, अर्ध्यात सापडलेल्या चिमुकलीच्या हृदयाचे ठोके बंद, दोन डॉक्टरांकडून जीवनदान

मावळ, पुणे: लोणावळा परिसरात असलेल्या भुशी डॅमच्या बॅक वॉटरमध्ये रविवारी दुपारी वर्षाविहारासाठी गेलेले दहाजण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते. त्यापैकी पाच जणांना वाचवण्यात यश आले होते. तर, पाचजण जणांचा पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. त्यातील चौघांचे मृतदेह सापडले आहेत तर एकाचा शोध सुरु आहे. यासर्वांमध्ये एक महिला तर इतर लहान मुलांचा समावेश आहे. ज्या पाच जणांना वाचवण्यात आलं, त्यापैकी एका लहान मुलीचे हृदयाचे ठोके बंद पडले होते. मात्र, तिच्यासाठी दोन डॉक्टर जे लोणावळ्यात पर्यटनासाठी आले होते, ते देवदूत ठरले. त्यांनी या मुलीचे प्राण वाचवले.

वाचवलेल्या पाचजणांपैकी एक मुलीच्या हृदयाचे ठोके बंद पडले होते. तेव्हा तिथे वर्षाविहारासाठी आलेल्या दोन डॉक्टरांनी तात्काळ तिला सीपीआर दिला आणि माऊथ टू माऊथ ब्रिधिंगने तिला जीवनदान दिलं. ही मुलगीही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली होती, जेव्हा तिला वाचवण्यात आलं तेव्हा तिच्या हृदयाचे ठोके बंद पडलेले होते.

एकाच कुटुंबातील पाचजण वाहून गेले

भुशी डॅमवर घडलेल्या या दुर्घटनेत नूर शाहिस्ता अन्सारी (वय ३५), अमिना अदिल अन्सारी (वय १३), मारिया अन्सारी (वय ७), हुमेदा अन्सारी (वय ६) आणि अदनान अन्सारी (वय ४, सर्व रा. सय्यदनगर, हडपसर) हे सर्व पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहेत. यापैकी तिघांचे मृतदेह काल सापडले होते. तर आज आणखी एकाचा मृतदेह सापडला आहे. एकजण अद्यापही बेपत्ता आहे. त्याचा शोध सुरु आहे.
Lonavala Bhushi Dam: मोठी बातमी! भुशी डॅमच्या बॅक वॉटरमध्ये बुडून चार पर्यटकांचा मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश

लग्न सोहळ्यासाठी आग्रा येथून पाहुणे आलेले

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यदनगर येथील अन्सारी कुटुंबातील १५ ते १६ जण रविवारी सुट्टीच्या निमित्ताने लोणावळ्यात आलं होतं. ते सर्व जण जुपारी १२ वाजेच्या सुमारास लोणावळ्यातील भुशी धरणाच्या मागील बाजूस असलेल्या धबधब्याकडे गेले होते. त्यानंतर ते धबधब्याच्या पाण्यात भिजण्याचा आनंद घेत होते. तेव्हा भुशी डॅमच्या परिसरात मुसळधार पाऊस झाला, पण अन्सारी कुटुंबाला याचा अंदाज आला नाही. ते पण्यात भिजत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि हे सर्व पाण्याच्या मधोमध अडकले. त्यांनी एकमेकांना घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्नही केला, पण पाण्याच्या प्रवाह इतका होता की सगळे एका मागोमाग एक वाहून गेले. यापैकी ज्यांना पोहता येत होतं ते बचावले गेले तर इतर सर्व वाहून गेले. या घटनेने अन्सारी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

अन्सारी कुटुंबात लग्न असल्याने आग्रा येथून नातेवाईक या लग्न सोहळ्यासाठी आले होते. पाहुण्यांनी लोणावळ्यात जाण्याची इच्छा व्यक्त केल्याने हे कुटुंब लोणावळ्यात आलं होतं. मात्र, तिथे पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांच्यासोबत ही दुर्दैवी घटना घडली.