भुजबळांना मंत्रिपद, कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया समोर, बोलून दाखवली मनातील ती खंत

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची अखेर मंत्रिपदी वर्णी लागली आहे, त्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यात पुन्हा एकदा बहुमतानं महायुतीचं सरकार सत्तेत आलं, मात्र त्यावेळी भुजबळ यांना मंत्रिपदानं हुलकावणी दिली होती, तर दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद मिळलं होतं. मंत्रिपद न मिळाल्यानं भुजबळ नाराज होते, त्यांनी अनेकदा आपली नाराजी उघड व्यक्त केली होती. मात्र आता पुन्हा एकदा भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. भुजबळांच्या मंत्रिपदावर मंत्री माणिकराव कोकाटे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हटलं कोकटे यांनी?

भुजबळ यांचं स्वागत आहे, राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी सर्व समावेशक मंत्रिमंडळ तयार केलं आहे.  ओबीसी चेहरा असावा असं त्यांना आधीपासून वाटत होतं,  चुरस वगैरे मी मानत नाही. भुजबळांच्या मंत्रिपदाचा नाशिक आणि महाराष्ट्राला फायदा होईल, दावा मी कशावरच करत नाही, पक्ष महत्वाचा आहे. एकाच पक्षात राहून आपण गटबाजी करत राहिलो तर काही उपयोग होणार नाही, भुजबळ आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाहीत. काही लोक उतावीळ आहेत. अजितदादा न्याय देतात. काही वेळेस वाट बघावी लागते. लगेच एखाद्या गोष्टीवर भाष्य करणं चुकीचं असतं, असं कोकाटे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी भुजबळांना टोला देखील लगावला आहे. ‘जहा नही चैना, वहा नही रहना’ हे भुजबळांचे उतावीळ पणाचे वक्तव्य होतं. भुजबळ आमच्यापेक्षा देखील सिनियर आहेत. भुजबळांनी वक्तव्य करण्यापूर्वी वाट बघायला हवी होती, आता त्यांना न्याय मिळाला आहे, आम्हाला सगळ्यांना त्याचा फायदा होईल, असं कोकाटे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान भुजबळांना मंत्रिपद मिळाल्यानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला होता. यावर देखील कोकाटे यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे यांचं ते व्यक्तिगत मत आहे. त्यांचं आणि भुजबळांचं काय आहे ते मला माहिती नाही, अजित पवार यांचं खंबीर नेतृत्व आहे. मी जर अजित पवार यांच्या लवकर जवळ गेलो असतो तर फायदा झाला असता, असो, देर आये दुरुस्त आये, असं म्हणत यावेळी त्यांनी आपल्या मनातील खंत देखील बोलून दाखवली आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)