भोली सूरत दिल के खोटे.. हे गाणं अनेकांना माहीत असेलच. अशाच भोळ्या, भाबड्या चेहऱ्याचा वापर करून वावरणाऱ्या आणि लोकलमधील महिलांच्या पैशांवर, दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या एका सराईत महिला चोराला डोंबिवली रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. भोळा भाबडा चेहरा बनवून रेल्वे प्रवासादरम्यान महिला रेल्वे प्रवाशांना या ना त्या बहाण्याने बोलण्यात गुंतवून हातचलाखीने त्यांच्या पर्स मधील मौल्यवान दागिने, आणि रोकड ती लांबवत होती. वैशाली सचदेव असे या महिला चोराचे नाव असून ती रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तिच्या विरोधात याआधी देखील चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती डोंबिवली रेल्वे पोलिसांनी दिली.
कशी झाली अटक ?
रेल्वे प्रवासादरम्यान लोकल गाडीमध्ये महिलांच्या डब्यात महिलांना बोलण्यात गुंतवून गर्दीचा फायदा घेत हातचलाखीने महिलांची पर्स व मोबाईल फोन चोरी होण्याच्या घटना गेल्या काही दिवसांत वाढल्या आहेत. याच वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली रेल्वे पोलिसांनी लोकलमध्ये ,प्लॅटफॉर्मवर ग्रस्त वाढवली होती . याच दरम्यान कालसायंकाळी साडेसहाच्या सुमारास डोंबिवलीहुन आसनगावच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये काही महिलांना पर्स मधील मोबाईल फोन, तसेच त्यांची छोटे पर्स चोरी झाल्याचे लक्षात आले.
मात्र यापैकी काही महिलांना एका महिलेची पर्स उघडी असल्याने त्या महिलेवर संशय आला. त्यांनी त्या महिलेला हटकले, मात्र तिने उत्तर तर दिलं नाहू, उलट ती पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली. हे पाहून लोकलमधील इतर महिलांनी आरडाओरडा केल्याने फलटावर गस्त घालत असलेल्या डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी या संशयित महिलेस ताब्यात घेतलं. तिची झडती घेतली असता तिच्याकडे चोरी केलेला महागडा मोबाईल फोन, तसेच काही रोख रक्कम आढळून आली .
अखेर पोलिसांनी तिला हिसका दाखवताच ती पोपटासारखी बोलू लागली आणि तिचा गुन्हा कबूल केला. तिचे नाव वैशाली सचदेव असून ती रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. तिच्या विरोधात याआधी देखील रेल्वेत महिलांच्या डब्यामध्ये महिलांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या पर्स मधून सोन्याचे दागिने, छोटे पर्स तसेच मोबाईल फोन ,रोख रक्कम चोरी करण्याचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. डोंबिवली रेल्वे पोलिसांनी वैशालीला बेड्या ठोकल्या असून याप्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलीस पुढील तपास करत आहेत