वकिलासाठी कारकुनी करणारा झाला न्यायाधीश; संघर्षमय प्रवास वाचून तुमचेही डोळे पाणावतील

कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटी याच्या बळावर माणूस काहीही साध्य करु शकतो, याचे एक जिवंत उदाहरण समोर आले आहे. भोरच्या एका तरुणाने हे शक्य करुन दाखवलं आहे. वकील कार्यालयात कारकुनाचे काम करणाऱ्या अमित श्रीकृष्ण साठे या २८ वर्षीय युवकानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे. त्याने राज्यातील निवड झालेल्या ११४ न्यायाधीशांच्या यादीत त्याने ३६ वा क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे आता अमित दिवाणी न्यायाधीश आणि न्यायदंडाधिकारी म्हणून आपल्या न्यायदानाची भूमिका बजावणार आहे.

अमितचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. अमित हा भोरमधील एका सामान्य कुटुंबातील जन्मला. त्याच्या घराची परिस्थिती प्रचंड बेताची होती. त्याचे शालेय शिक्षण श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात झाले. तर उच्च माध्यमिक शिक्षण अनंतराव थोपटे महाविद्यालयात झाले. वडील पोस्ट खात्यात कार्यरत असताना आईच्या शिकण्याच्या प्रेरणेने अमितला शिक्षणाची आवड निर्माण झाली. वाणिज्य शाखेत पदवी घेतल्यानंतर त्याला एलएलबी करायची इच्छा होती, पण घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याला एक वर्षाचा ब्रेक घ्यावा लागला.

कसा केला अभ्यास?

या काळात अमितनं बँकेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या अर्जांचे काम केले. त्यानंतर त्याला भोरमधील ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. विजय मुकादम यांच्या कार्यालयात कारकुनाची नोकरी मिळाली. याच ठिकाणी काम करत असताना अॅड. मुकादम यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने एलएलबीला प्रवेश घेतला आणि अभ्यासाला सुरुवात केली. २०२१ मध्ये पुण्यातील यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालयातून त्याने एलएलबीची पदवी मिळवली. त्यानंतर लगेचच त्याने २०२२ च्या दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेची तयारी सुरू केली. काही कारणांमुळे परीक्षा लांबणीवर पडली, तरी अमितनं आपला अभ्यास अखंड सुरू ठेवला. तो नियमितपणे अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या ग्रंथालयात जाऊन अभ्यास करत असे.

सलग दोन वर्षे अथक परिश्रम घेतल्यानंतर आणि अॅड. विजय मुकादम व अॅड. अजिंक्य मुकादम यांच्या मार्गदर्शनाखाली अमितनं या परीक्षेची जोरदार तयारी केली. यासोबतच पुण्यातील एका खासगी अकादमीतील आठवड्यातून एकदा होणाऱ्या व्याख्यानाचाही त्याला लाभ झाला. या सर्व प्रयत्नांमुळेच अमितनं पहिल्याच प्रयत्नात हे यश संपादन केले आहे.

अनेक तरुणांना नवी दिशा आणि प्रेरणा देणारा

अमितच्या या अभूतपूर्व यशानंतर संपूर्ण भोर तालुक्यात सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. त्याच्या आई-वडिलांनीही आनंदाश्रू अनावर झाले आहेत. तालुक्यातील नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अमितवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. एका सामान्य कारकुनाच्या मुलाने न्यायाधीशासारखे मोठे पद मिळवल्याने अनेकांनी त्याचे अभिनंदन केले आहे. अमितचा हा संघर्षमय प्रवास निश्चितच अनेक तरुणांना नवी दिशा आणि प्रेरणा देणारा आहे

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)