आज पहिल्यांदाच दोन खासदार या सांजआरतीला उपस्थित राहिले. विशेष म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार याही पहिल्यांदाच या साज आरतीला उपस्थित होत्या, तर लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार याही इथे उपस्थित होत्या. ज्यावेळी सुनेत्रा पवार आल्या, त्यावेळी त्या पालखी जिथे ठेवतात, त्या खालच्या भागात उभ्या होत्या. त्या तिथेच उभ्या राहिल्या.
तर सुप्रिया सुळे आल्यानंतर शारदा प्रांगणाच्या व्यासपीठावर आल्या. व्यासपीठावरूनच त्यांनी लोकांना नमस्कार केला तसेच त्या महिलांमध्ये गेल्या. गर्दीत उभ्या पुरुष वारकऱ्यांमध्ये गेल्या. त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर काही वेळाने पालखी आणण्यात आली. पालखी आणून मांडली, तेव्हा सुनेत्रा पवार खालीच होत्या. सुप्रिया सुळे मात्र वरतीच उभे राहिल्या, काही वेळानंतर तिथे प्रतिभा पवार आल्या.
प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळे या दोघी मायलेकी एकाच ठिकाणी थांबून होत्या. ज्यावेळी आरतीची वेळ आली त्यावेळी सुनेत्रा पवार यांनी ताईंना खाली बोलवा असे सांगितले, परंतु सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे पाहत खाली खूप गर्दी आहे, तुम्हीच आरती करा असे सांगत आरतीचा मान सुनेत्रा वहिनीकडे दिला आणि आरती पार पडली.
बारामतीच्या राजकारणात नेहमीच निवडणुकीनंतर राजकारण होत नाही आणि समाजकारण करतो, असे पवार कुटुंब सांगतं त्याचा प्रत्यय या निमित्ताने सांजआरतीच्या वेळेला आला . २०२४च्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत झाली होती. या लढतीत सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली होती. त्यानंतर सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली.