Baramati Lok Sabha: बारामती लोकसभा मतदारसंघात नवा ट्विट्स; रोहित पवारांच्या आरोपानंतर गुन्हा दाखल

बारामती(दीपक पडकर) : महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात पैसे वाटप केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आला होता. या संदर्भात पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटर हँडल वरून पैसे वाटपाचा व्हिडिओ शेअर करत पुरावाही दिला होता. अखेर याची दखल घेत बारामतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सात मे रोजी दुपारी तीनच्या सुमारास शहरातील मतदान केंद्र क्र. १६७ बारामती नगरपरिषद, निलम पॅलेस जवळील साठेनगर येथील अंगणवाडी परिसरात कोणीतरी अज्ञात व्यक्ती पैसे वाटप करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रसारित झाला होता. याची दखल घेत बारामतीचे तहसीलदार यांच्यामार्फत पुणे जिल्हा परिषदेचे उपविभाग पाटबंधारे शाखा अभियंता केशव तुकाराम जोरी यांनी फिर्याद दिली आहे.

आमदार रोहित पवार यांनी ट्विटर हँडलवर शेअर केलेल्या व्हिडिओची दखल घेऊन प्रशासनाकडून अज्ञाता विरोधात लोकप्रतिनिधीत्व 123(1), भा.द.वि.क. 171 ब अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३२ सेकंदाच्या या व्हिडिओ क्लिपमध्ये पैसे वाटपाचा प्रकार दिसून येत आहे.


बारामती लोकसभेचे दिनांक ७ मे रोजी मतदान पार पडत असतानाच मतदारांना पैसे वाटप होत असल्याचा व्हिडिओ शेअर करत आपल्या ट्विटर अकाउंट वरून आमदार रोहित पवार यांनी…अजितदादा घ्या….. #ED आणि #CBI ने कारवाई केलेल्या तुमच्या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांसोबत तुमच्या पदाधिकाऱ्याच्या नातलगाचा पैसे वाटल्याचा आणखी एक व्हिडिओ….. असे कॅप्शन दिले होते.