Baramati-Karjat Passenger : बारामती-कर्जत पॅसेंजरला ग्रीन सिग्नल मिळणार? प्रवाशांकडून जोरदार मागणी

प्रतिनिधी, पुणे : पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी सकाळी नऊ ते दुपारी तीनपर्यंत कोणतीही रेल्वे नाही. त्यामुळे प्रवाशांना दररोज सव्वासहा तास ताटकळत थांबावे लागते किंवा खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करावा लागतो. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पूर्वी दुपारच्या सत्रात सुरू असलेली बारामती ते कर्जत पॅसेंजर सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.पुणे ते मुंबई दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पुण्यातून सकाळी नऊ वाजता ‘मुंबई सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस’ गेल्यानंतर थेट दुपारी तीन वाजून १५ मिनिटांनी मुंबईला जाण्यासाठी ‘डेक्कन एक्स्प्रेस’ उपलब्ध आहे. दरम्यानच्या सुमारे सहा तास पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी दिवसा एकही रेल्वे नाही. त्यामुळे पुणे ते मुंबई प्रवास रस्ते मार्गानेच करावा लागतो. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना रेल्वे स्थानकावरच ताटकळत बसावे लागते. सहा तास रेल्वे नसल्यामुळे वृद्ध, महिला आणि लहान मुलांचे अतोनात हाल होतात. या पार्श्वभूमीवर प्रवाशांचे शिष्टमंडळ रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन देणार आहे.

Monsoon 2024 : मान्सूनपूर्व तयारीसाठी वैद्यकीय यंत्रणा सज्ज, संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी पूर्वनियोजन

दिवसा मुंबईसाठी आठ गाड्या

दररोज सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेत पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी सात रेल्वे आहेत. सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी ‘सिंहगड एक्स्प्रेस’, सहा वाजून २० मिनिटांनी ‘पनवेल एक्स्प्रेस’, सात वाजून १५ मिनिटांनी ‘डेक्कन क्वीन’, सात वाजून ५० मिनिटांनी ‘प्रगती एक्स्प्रेस’, आठ वाजून २० मिनिटांनी ‘मुंबई सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस’ आणि सकाळी नऊ वाजता ‘वंदेभारत’ उपलब्ध आहे. दुपारी तीन वाजून १५ मिनिटांनी ‘डेक्कन एक्स्प्रेस’ आणि दुपारी तीन वाजून २५ मिनिटांनी ‘दौंड-इंदूर सुपरफास्ट एक्स्प्रेस’ या गाड्या आहेत. दिवसा गाड्या कमी असल्यामुळे प्रवाशांना उभे राहून धक्के खात प्रवास करावा लागतो. ‘वंदेभारत’चे तिकीट महाग असल्याने तिच्यातून प्रवास करणे सर्वसामान्यांना परवडत नाही.

‘निर्णय रेल्वे बोर्ड घेईल’

गेल्या दोन वर्षांपासून बारामती-कर्जत पॅसेंजर पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी करीत आहेत. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. करोनाकाळानंतर ही पॅसेंजर बंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून, ही पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. या गाडीचा निर्णय मुंबई विभाग आणि रेल्वे बोर्डाकडून घेतला जाईल, असे रेल्वेचे अधिकारी सांगत आहेत.