गोळी घालून जखमी केले
गुरुवार २७ जून रोजी रात्री अकराच्या सुमारास बारामती तालुक्यातील निंबुत येथे ही घटना घडली. सदर घटनेत रणजित निंबाळकर (रा. मु.पो तावडी ता.फलटण जि. सातारा सध्या (रा. स्वामी विवेकानंद नगर, फलटण ता. फलटण जि. सातारा) हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी अंकिता रणजित निंबाळकर यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, गौतम शहाजी काकडे, गौरव शहाजी काकडे (दोघे रा. निंबुत ता.बारामती जि.पुणे ) आणि तीन अनोळखी अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बैल ३७ लाख रुपयांना विकला
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गौतम काकडे यांना फिर्यादीचे पती रणजीत निंबाळकर यांनी ‘सुंदर’ नावाचा बैल ३७ लाख रुपयांना विकला होता, त्यापैकी पाच लाख रुपये विसार म्हणून दिले होते. उर्वरित रक्कम २७ जून रोजी नेण्यासाठी बारामती तालुक्यातील निंबूत येथे त्यांच्या घरी बोलवले होते. त्यानुसार रात्री अकराच्या सुमारास रणजीत निंबाळकर फिर्यादी अंकिता निंबाळकर व त्यांची दहा महिन्यांची मुलगी अंकुरण हे निंबुत येथे गौतम काकडे यांच्याकडे गेले होते. ”काकडे यांनी माझ्या पतीस जीवे मारण्याच्या उद्देशाने बोलवले होते”, असे फिर्यादीत म्हटले आहे.
मी तुम्हाला सकाळी पैसे देतो
तसेच गौतम काकडे हे रणजित निंबाळकर यांना म्हणाले की, ”तुम्ही संतोष तोडकर यांना मी तुम्हाला पैसे दिले नाहीत असे का सागिंतले? तुम्ही असे बोलायला नको होते. मी तुम्हाला सकाळी पैसे देतो. तुम्ही आता स्टॅम्प पेपरवर सही करा असे बोलले. त्यावेळी माझे पती त्यांना तुम्ही माझे राहीलेले पैसे द्या. मी लगेच सही करतो आणि जर तुम्हाला व्यवहार पूर्ण करायचा नसेल तर तुमचे ५ लाख रूपये मी तुम्हाला परत देतो. माझा बैल मला परत द्या असे बोलले. त्यानंतर आम्ही आमच्या गाडीकडे निघालो. त्यावेळी गौतम काकडे माझे पतीस “तू बैल कसा घेऊन जातो तेच मी बघतो”, असे म्हणून त्यांनी फोन लावून पोरांनो तुम्ही वर या असे सांगितले.
“ह्या सराला मारा लय बोलतोय हा”
त्यानंतर त्यांनी त्यांचा भाऊ गौरव यास फोन करून बोलावून घेतले. गौरव आणि अनोळखी ३ मुले तिथे आल्यावर गौतम काकडे हे आमच्याकडे पळत आले. त्यांनी गौरव आणि त्या अनोळखी ३ मुलांना “ह्या सराला मारा लय बोलतोय हा” असे म्हणाले. त्यावेळी गौरवच्या हातात काठी होती. ती काठी गौतम काकडे यांनी घेऊन ते मारण्यासाठी माझ्या पतीच्या अंगावर धावून जावून शिवीगाळ केली. त्यावेळी वैभव कदम हे ”गौतम काकडे यांना तुम्ही वाद घालू नका. आपण उद्या व्यवहारावर चर्चा करू” असे म्हणून त्यांना आडवत होते.
”तू बैल कसा नेतो तुला जिवंत ठेवतच नाय”
अनोळखी ३ पोरांनी आम्हाला शिवीगाळ करत असताना गौरवने ”तू बैल कसा नेतो तुला जिवंत ठेवतच नाय”, असं म्हणून त्याच्याकडे असणारे पिस्तुलमधून माझ्या पतीच्या डोक्यात १ गोळी झाडली. गोळी लागताच माझे पती खाली पडले”. असे फिर्यादीत म्हटले आहे. सदर घटनेचा तपास स.पो.नि.राहुल घुगे हे करत आहेत .