ही घटना आहे बारामती तालुक्यातील पिंपळी गावची..बारामतीचे पोलीस तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या बंदोबस्तात मग्न असतानाच सकाळच्या नऊ वाजता पिंपळी गावातील बाबासाहेब लक्ष्मण पवार हे पोलिसांकडे आले व त्यांनी तक्रार केली की, आपल्या 14 वर्षाच्या मुलाला संबंधित जाधव या नावाच्या व्यक्तीने अपहरण करून पळवून नेले आहे. पोलिसांनी लगेच गांभीर्याने तपासाला सुरुवात केली. तेव्हा ही माहिती मिळाली की, संबंधित अपहरणकर्ता व्यक्तीची बायको देखील पळून गेली आहे आणि ती बायको फिर्यादीच्या मुलाने नेली आहे. असा संशय या अपहरणकर्त्याला आहे, त्यामुळेच पीटम फाट करण्यासाठी त्याने संबंधित संशयित मुलाच्या धाकट्या भावाला पळवून नेले.
बारामती पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेतली आणि तपासाला सुरुवात केली. तांत्रिक विश्लेषणा नुसार आरोपीला फिर्यादी फोन करत होते. आणि फिर्यादीला आरोपी जाधव हा वेगवेगळी ठिकाणे सांगत, हुलकावणी देत होता. दरम्यान पोलिसांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणात आरोपी हा सांगली भागात असल्याचे आढळून आले. तेव्हा पोलिसांनी त्याला सांगलीतून ताब्यात घेतले आणि अठरा तासातच 14 वर्षीय विनायक नावाच्या मुलाची सुटका देखील केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान संबंधित आरोपीची बायको नक्की कोणी नेली व ती आता कुठे गेली याचा देखील शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे.
ही कामगिरी पोलिस निरीक्षक संतोष घोळवे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन चेके, कुलदीप संकपाळ, युवराज घोडके, हवालदार यशवंत पवार, मोहमंद अंजर मोमीन, अंकुश दळवी यांनी केली.