Baramati : लोकसभेनंतर विधानसभेसाठी बारामतीत पुन्हा मैदान ए जंग! शरद पवारांचे मिशन विधानसभा

बारामती : पक्षफुटीनंतर झालेल्या लोकसभा निवडणूकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला अवघी एक जागा मिळाली. आता विधानसभा तोंडावर असताना शरद पवार यांनी बारामतीत बारकाईने लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी ते बारामतीत व्यापारी आणि वकील वर्गाचा मेळावा घेणार असून दुष्काळी दौराही करणार आहेत. त्यामुळे बारामतीवरील अजित पवार यांच्या वर्चस्वासाठी हे घातक ठरू शकते.

जिल्ह्यासह बारामती तालुक्यात सर्व संस्थांवर अजित पवार यांची पकड आहे. या संस्थांचे पदाधिकारी, संचालक यांची मोठी ताकद त्यांच्याकडे आहे. परंतु तरीही लोकसभा निवडणूकीत बारामती तालुक्याने त्यांना अपेक्षित साथ दिली नाहीच उलट सुळे यांना येथून एक लाखांहून अधिक मताधिक्य देत अजित पवार यांना जोरदार धक्का दिला. सगळी ताकद, रसद असताना आणि भाजप, सेना, मित्रपक्षांची ताकद मागे असतानाही सुनेत्रा पवार बारामतीत मागे पडल्या.
Baramati News : अजित पवार सोबत नसताना खडकवासला वगळता प्रत्येकमतदारसंघात लीड, शरद पवारांची जादू, सुप्रियाताईंचा चौकार

बारामतीत मतांची बरोबरी राहिली असती तरी अजित पवार यांना आहेसे वाटले असते, परंतु तसे घडले नाही. बारामतीकरांनी त्यांना जोरदार झटका दिला. अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडणे आणि भाजपबरोबर जाणे हे मतदारांना रुचले नसल्याचे कारण यामागे असल्याचे बोलले जात आहे. विधानसभेलाही दादांना बारामतीत जखडून ठेवण्याची जोरदार तयारी शरद पवार गटाकडून सुरु आहे. त्यातच शरद पवार आता लोकसभेनंतर लागलीच बारामतीच्या दौऱ्यावर येत आहेत.

पक्षफूटीपूर्वी राज्य आणि केंद्रास्तरावरील कामातच शरद पवार लक्ष घालत होते. पण आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे बारामतीत विविध मेळावे यापुढील काळात घेत पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी शरद पवार प्रयत्नशील आहेत. बारामतीचा ग्रामीण भाग हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे लवकरच दुष्काळी दौऱ्याच्या निमित्ताने ते त्यांच्याशी संवाद साधतील. शरद पवार यांचा एक दौराही अजित पवार गटासाठी मोठा धोका निर्माण करू शकतो. लोकसभा निकालानंतर अजित पवार अद्याप बारामतीत आलेले नाहीत. शरद पवार यांनी मात्र तात्काळ काम सुरु केले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना उभारी मिळणार असून पक्ष संघटन वाढेल असे जाणकरांकडून बोलले जात आहे.