बाळासाहेब थोरातांनी सांगितले विधानसभेच्या पराभवाचे एकमेवं कारण, म्हणाले…

“मी 8 वेळा आमदार, 40 वर्षांपासून विधानसभा सदस्य आहे. मला तुम्ही नेहमी संधी दिली. 40 वर्ष आपण मला संधी दिली. प्रत्येक निवडणुकीत मताधिक्य वाढवून मला विधानसभेत पाठवलं. यावेळी देखील तुम्ही काम करत होता. मी राज्यात फिरत होतो. मला तुमच्या सगळ्यांवर विश्वास होता. पण नेमकं काय घडलं हे आजही समजत नाही. प्रत्येक वेगवेगळे कारण सांगत आहे”, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर बाळासाहेब थोरात यांनी पहिल्यांदा भाष्य केले.

विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर संगमनेरमध्ये काँग्रेसचा स्नेह संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात उपस्थितीत होते. यावेळी विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पहिल्यांदाच बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पराभवाची सल बोलून दाखवली.

“नेमकं काय घडलं, हे आजही समजत नाही”

“संगमनेर तालुका हा सुसंस्कृत तालुका आहे. तुम्ही मला नेहमीच संधी दिली. तुम्ही इकडे काम करत होता तर मी राहाता ( शिर्डी ) विधानसभेत प्रचाराचे काम पाहत होतो. नेमक काय घडलं याच विचार तुम्ही करताय आणि मीही करतो. 40 वर्ष आपण मला संधी दिली. प्रत्येक निवडणुकीत मताधिक्य वाढवून मला विधानसभेत पाठवल. यावेळी देखील तुम्ही काम करत होता. मी राज्यात फिरत होतो. मला तुमच्या सगळ्यांवर विश्वास होता. पण नेमकं काय घडलं, हे आजही समजत नाही. प्रत्येक जण वेगवेगळे कारण सांगत आहे. मी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. जे दोष असतील ते निश्चित दूर करु याची ग्वाही मी देतो”, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

“जुन्या पिढीला सगळा इतिहास माहिती आहे. मात्र तरुण पिढीला ते अजूनही माहित नाही. 1985 मध्ये काय परिस्थिती होती आणि आज काय याचा विचार केला पाहिजे. निळवंडे धरणाचे श्रेय घेण्यासाठी आज अनेक जण पुढे येत आहे. मात्र त्यांचा सहभाग काय हे एकदा त्यांनी सांगावं”, अशा टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.

“कुणी म्हणतात ईव्हीएम घोटाळा”

“मी शहराचा पाणी प्रश्न कायमचा सोडवला. थेट पाईपलाईन शहरासाठी आणली. मात्र ज्यांनी त्या दिवशी फटाके वाजवले ना त्यांनी सुद्धा आपण आणलेलंच पाणी घरात गेल्यावर प्यायले असेल. थोडी तरी कृतज्ञता ठेवायला हवी. शहरातून कमी मताधिक्य मिळाले. इतके वर्ष काम केलं पण कधी कोणाला त्रास दिला नाही किंवा ब्लॅकमेल केल नाही. तालुक्यात शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न आपण केला. पराभव झाल्यानंतर अनेक जण वेगवेगळी कारण माझ्यासमोर देत आहे.. कुणी म्हणतात ईव्हीएम घोटाळा…(यात सुद्धा शंका घेण्यासारखं आहे) मात्र पराभव का झाला, यांचं परीक्षण आपण स्वतः देखील केलं पाहिजे, म्हणून सर्वांशी संवाद साधला”, असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

“तुमच्या भरोशावर मी राज्यात फिरलो, पण आता…”

“आम्हाला त्रास झाला तर मी लढणारच, कोणताही त्रासाला आणि तुमच्या धमक्यांना भीक घालणारे आम्ही नाही. तुमच्या आणि माझ्या गाफीलपणामुळे हा पराभव झाला हे लक्षात ठेवा. तुमच्या भरोशावर मी राज्यात फिरलो. पण आता सगळं दुरुस्त करायच आहे. मी तिकडे चांगलं करायला जातो. आपल राजकारणाचा फाउंडेशन एकदम पक्क आहे. यावेळी थोडासा हलल्याने ते कमकुवत होणार नाही. तुम्ही साथ द्या”, असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)