सुरेश धसांनी आरोप केलेली बडी मुन्नी कोण? अजितदादा पत्रकार परिषदेमध्येच संतापले, म्हणाले…

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे, या प्रकरणात सुरुवातीपासूनच भाजप आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे, दररोज सुरेश धस यांच्याकडून या प्रकरणात नवे आरोप करण्यात येत आहेत, सुरेश धस यांनी या प्रकरणावर बोलताना आता बडी मुन्नीचा उल्लेख केला आहे. मात्र ही बडी मुन्नी नेमकी कोण आहे हे अद्याप समोर आलेलं नाही? यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच संतापले, ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

नेमकं काय म्हणाले अजित पवार? 

सुरेश धस यांनी या प्रकरणावर बोलताना बडी मुन्नीचा उल्लेख केला होता. त्यानंतर ही बडी मुन्नी नेमकी कोण आहे यावर चर्चा सुरू झाली. याबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारला असता ते चांगलेच संतापले. हे त्यांनाच विचारा, ते जर असल्या फालतू गोष्टी बोलत असतील तर मी आता नाव घेऊन बोलणार आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.  त्यामुळे हे त्यांनाच विचारा असं अजित पवार यावेळी म्हणाले.

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया  

संतोष देशमुख हत्याप्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होत आहे. यावर देखील अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. तुमच्याकडे पुरावे असतील तर ते न्यायालयाला द्या, सीआयडीला द्या, एसआयटीला द्या. पण पुरावे नसताना आरोप करणं कितपत योग्य आहे असा सवाल यावेळी अजित पवार यांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की या प्रकरणावर सध्या तीन यंत्रणा काम करत आहेत. एसआयटी नियुक्त करण्यात आली आहे, सीआयडी तपास करत आहे, आणि न्यायालयीन चौकशी देखील सुरू आहे. चौकशीत दोषी आढळल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, जो दोषी असेल त्याला पाठिशी घालणार नाही. दोषींना कडक शिक्षा होईल असंही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)