बच्चू कडूंना पराभवाचा धक्का, पहिली प्रतिक्रिया समोर म्हणाले मी…

लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला राज्यात मोठं अपयश आलं होतं, मात्र त्यातून भरारी घेत विधानसभा निवडणुकीमध्ये मोठं यश मिळवलं आहे. महाविकास आघाडीला राज्यात पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. मनसेला खातही उघडता आलं नाही, तर तिसऱ्या आघाडीच्या स्थापनेमध्ये मुख्य भूमिका असलेल्या बच्चू कडू यांचा देखील पराभव झाला आहे. अचलपूर विधानसभा मतदारसंघात बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला आहे. पराभवानंतर पहिल्यांदाच त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय म्हणाले बच्चू कडू? 

सर्व कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो, त्यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले. माझ्या या पराभवाने तुम्ही खचून जाऊ नका, बच्चू कडू पदामुळे नाही तर कार्यामुळे आहे. हे कार्य आपण पुढे करत राहू तुम्ही स्वतःला एकटे समजू नका. आज हरलो तरी उद्या आपण जिंकू, कुठे चुकलो असेल, कुठे कमी पडलं असेल त्याचा शोध घेऊ, असं बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांना म्हटलं आहे.

यावेळी अचलपूर मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळाली. महायुतीकडून भाजपचे प्रवीण तायडे हे निवडणुकीच्या रिंगणात होते. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे अनिरुद्ध देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली होती. तिसऱ्या आघाडीकडून बच्चू कडू यांनी या मतदारसंघात निवडणूक लढवली मात्र त्यांचा या मतदारसंघात पराभव झाला आहे. भाजपचे प्रवीण तायडे हे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

दिग्गजांचा पराभव 

या विधानसभा निवडणूक निकालाचं वैशिष्ट म्हणजे अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहे थोरात, यशोमती ठाकूर, माणिकराव ठाकरे यांचा पराभव झाला आहे. कोकणात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. विदर्भात देखील महाविकास आघाडीची पिछेहाट झाली. मनसेला तर खातं देखील उघडता आलं नाही, माहीममधून राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)