उन्ह्याच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी गाईडलाइन्स जारीImage Credit source: TV9
तोंडावर आलेल्या उन्हाळ्यामुळे मुंबईकरांच्या घामाच्या धारा वहायला लागल्या आहेत. येत्या काही काळात तापमानाचा वार प्रचंड वाढणार असून त्यामुळे उष्माघाताचे प्रकार होऊ नयेत, नागिरकांना त्रास होऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने उष्माघात नियंत्रणासाठी आणि प्रतिबंधासाठी काही खास गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. मुंबईत जाणवत असलेल्या उष्ण लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी या काळात काय करावे? आणि काय करू नये याबाबतच्या थेट सूचना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार नियमित करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे आणि सावध रहावे, उष्माघातापासून बचाव करावा असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.
काय आहे मुंबई महापालिकेच्या गाईडलाइन्स ?
– कडक उन्हाच्या वेळी स्वयंपाक करणे टाळा.
– स्वयंपाकघरात हवा खेळती रहावी यासाठी दरवाजे, खिडक्या उघडे ठेवा.
– मद्य, चहा, कॉफी, कार्बोनेटेड शीतपेये पिणे टाळावे, कारण ते शरीराला हानी पोहोचवू शकतात.
– शिळे अन्न खाऊ नका.
– सावध रहा, स्वत:ची काळजी घ्या.
उन्हाचा तडाखा वाढल्याने माठांच्या, रांजणांच्या किमतीत वाढ
दरम्यान उन्हाचा तडाखा वाढल्याने मातीचे माठ आणि राजणांच्या किमतीत वाढ झाली आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने बाजारात गरिबांचे फ्रीज म्हणून ओळखले जाणारे माठ विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहेत. पण मागील वर्षीच्या तुलनेत यंदा माठांच्या किमती 50 ते 100 रुपयांनी वाढल्या आहेत. माठ तयार करण्यासाठी लागणाऱ्या मातीच्या किमती वाढल्या असून वाहतूक खर्चही वाढला आहे. त्यामुळे या गरिबांचा फ्रीज अर्थात माठांचे दर वाढले आहेत. यंदा एका मध्यम आकाराच्या माठाची किंमत 250 ते 300 रुपयांच्या घरात पोहोचली आहे. ग्रामीण भागातील आणि शहरातील नागरिक उन्हाच्या कडाक्यापासून बचाव करण्यासाठी आणि पाणी गार ठेवण्यासाठी माठ आणि रांजणांची मागणी करत आहेत. या विक्रेत्यांच्या मते, उन्हाची तीव्रता आणखी वाढल्यास विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे.
नाशिकचा पारा पोहोचला 38 अंशांवर
मार्च महिन्यातच नाशिकचा पारा 38.7 अंशांवर पोहोचला असून तापमान वाढल्याने नागरिकांना उन्हाचे चटके बसत आहेत. उन्हापासून संरक्षण मिळवण्यासाठी नागरिकांकडून टोपी आणि स्कार्फचा वापर वाढला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून नाशिकच्या तापमानात वाढ होत आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये सर्वाधिक 40 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. नाशिक शहरात देखील मार्च महिन्यातच तापमान 38.7 अंशावर गेल्याने पुढच्या काही दिवसात तापमान 40° वर जाण्याची देखील शक्यता आहे. दुपारच्या सुमारास काम नसेल तर बाहेर न फिरण्याचा वैद्यकीय तज्ञांनी नागरिकांना सल्ला दिला आहे.