लोकसभा निवडणूकीत बारामतीत पवार कुटुंबियांनी एकमेकांवर केलेले आरोप-प्रत्यारोप राज्यभर गाजले. उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांची पत्नी सुनेत्रा व मुले पार्थ व जय हे एका बाजूला तर उर्वरित पवार कुटुंबिय दुसऱ्या बाजूला अशी स्थिती बारामतीत पाहायला मिळाली. शरद पवार यांच्या बाजूने आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार या तरुणांनी उपमुख्यमंत्र्यांविरोधात बारामतीत जोरदार खिंड लढवली. उपमुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याची एकही संधी या दोघांनी सोडली नाही. तर अजित पवार यांनीही प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात शरद पवार यांच्याऐवजी या दोघांनाच टार्गेट केल्याची स्थिती दिसून आली.
लोकसभा निवडणूकीचा निकाल अद्याप लागणे बाकी आहे. पण निकालाची वाट न बघताच युगेंद्र पवार बारामतीत कमालीचे अॅक्टीव्ह झाले आहेत. गेल्या १५ दिवसांपासून त्यांनी तालुक्यात वादळी वारे, पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांच्या घरांची पाहणी करत आवश्यक ती मदत केली. जनता दरबारात अनेकांचे प्रश्न जाणून घेतले. नोकरी, प्रवेश, पाणी टंचाई आदी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी सुरु केला. त्यांच्या पुढाकारातून तालुक्यात शरयू फौंडेशनच्या माध्यमातून गावोगावी टँकर सुरु करण्यात आले आहेत. त्यांचे हे काम बारामतीकरांच्या नजरेत भरणारे आहे. शरद पवार गट कार्यरत झाल्याने आता अजित पवार गटानेही प्रयत्न सुरु केले आहेत.
जय पवार यांनी गुरुवारी बारामतीत राष्ट्रवादी भवनात नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांना निवेदने देण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. एकूणच युगेंद्र व जय पवार या दोघांनीही आपापल्या पक्षाच्या बांधणीला आत्तापासूनच सुरुवात केल्याचे बारामतीत दिसून येत आहे.