Ashish Shelar : राजकारण सोडण्याच्या वक्तव्यावरुन आशिष शेलार यांचा युटर्न, म्हणाले – आधी उद्धव ठाकरे यांनी…

मुंबई : लोकसभा निवडणूक २०२४ चे निकाल ४ जून रोजी जाहीर झाले. महाराष्ट्रात, मुंबईत भाजपला, महायुतीला मोठा धक्का बसला आहे. यादरम्यान भाजप नेते आशिष शेलार यांचं राजकारण सोडणार असल्याचं एक वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. त्या वक्तव्यावरुन ठाकरे गटाकडून त्यांचा समाचार घेत त्यांना डिवचण्यात आलं. आशिष शेलार यांनी पत्रकारांशी संवाद साधत प्रत्युत्तर दिलं आहे.

ते म्हणाले, ‘व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर लक्षात येईल की पहिले उद्धव ठाकरे यांना संन्यास घ्यावा लागेल. कारण ४५ च्या वर देशात जागा येणार नाहीत, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. आता ४५च्या वर भाजप गेली आता उद्धव ठाकरे संन्यास घेणार का ते सांगावं. निवडणुकांच्या निकालांवरील विश्लेषण पाच दिवसांत मांडू. जिंकलेल्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा’ असं म्हणत आशिष शेलार यांनी त्यांच्या राजकारण सोडण्याच्या वक्तव्यावर युटर्न घेतला आहे.
Jalgaon News : जळगाव – रावेर मतदारसंघात भाजपच्या महिला उमेदवारांची बाजी, मविआच्या उमेदवारांना भुईसपाट करत रचला इतिहास

राजकारण सोडण्याबद्दल काय म्हणालेले आशिष शेलार?

लोकसभा निवडणूक निकालांआधी आशिष शेलार यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. ते म्हणालेले, ‘उद्धव ठाकरे म्हणतात की देशात भाजपच्या ४५ जागा येणार नाहीत. पण समजा त्याहून अधिक जागा आल्या तर तुम्ही राजकारण सोडाल काय?’ असा सवाल करत त्यांनी उद्धव ठाकरेंना केला होता.

त्यापुढे ते म्हणालेले, ‘आमच्यामुळे २०१९ मध्ये तुम्ही १८ जागांवर निवडून आला होतात. तुम्ही मर्दांचा पक्ष चालवत असाल आणि मर्दांचं नेतृत्व करत असाल तर माझे जाहीर आव्हान तुम्हाला आहे, की तुम्ही महाराष्ट्रात महाविकास आघाडी मिळून १८ जागा जिंकल्या, तर मी राजकारण सोडेन’.

आता ठाकरे गटातून आशिष शेलार यांना त्यांच्या या राजकारण सोडण्याच्या वक्तव्यांची आठवण करुन दिली जात आहे. त्यावर आशिष शेलार यांनी आपल्या वक्तव्यावरुन युटर्न घेत आधी उद्धव ठाकरेंना संन्यास घ्यावा लागेल असं म्हटलं आहे. आशिष शेलार यांच्या या प्रत्युत्तराची आता मोठी चर्चा होताना दिसत आहे.