Ashadhi Wari: अपार भक्तीचा सोहळा रंगला, हरिनामात तल्लीन झाले किन्नर वारकरी

बारामती : आषाढी वारीत सर्वच वारकरी हरिनामात तल्लीन होतात. यामध्ये मग वय, जात, धर्म, लिंग यापलीकडे गेलेला अपार भक्तीचा सोहळा अनुभवायला मिळतो. यामुळे आपली पंढरीची वारी ही खास ठरते. याच वारीतील आदर्शवत उदाहरण म्हणजे किन्नर समाजही यात गुण्यागोविंदाने सामील झाला आहे.

किन्नर आखाड्याच्या श्री श्री १००८ महामंडलेश्वर डॉ. दीपा नंदगिरी बेलवाडीच्या रिंगण तळावर अशाच भक्तीत गुंग झाल्या होत्या. त्यांच्यासह सात ते आठ किन्नर हे सध्या तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील अकराव्या नंबरच्या दिंडीमध्ये सहभागी आहेत. दीपा यांचं हे दुसरं वर्ष आहे, तर इतरांचं हे तिसरे वर्ष आणि एक जण तर धाराशिवच्या असून, गेली १४ वर्षे माऊलींच्या पालखी सोहळ्यात चालतात.

गेल्या वर्षीपासून दीपा नंदगिरींसोबत या अन्य किन्नर यांनी देखील तुकोबारायांच्या पालखीची वाट धरली आहे. संस्कृती, परंपरा, विचारांचा वारसा आणि अध्यात्माचा प्रभाव लक्षात घेत यांची पावलं विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरीच्या दिशेने निघाली आहेत. पायी दीपाताईंसोबत आठ जण सहभागी आहेत.
Sant Tukaram Maharaj Palakhi: आषाढी वारीतील एकोप्याचे आदर्शवत उदाहरण; मुस्लीम कुटुंबीयांकडून तुकाराम महाराजांच्या पालखीला पायघड्या
डॉ. दीपा नंदगिरी यांनी सांगितले की, वारीत सहभागी व्हायचं होतं, खूप इच्छा होती. दिंडीकऱ्यांना बोलले. दिंडी प्रमुखांनी सांगितलं या, पण…. नंतर इतरांचा विरोध लक्षात घेत त्यांनी मला दिंडीतून हाकलून दिलं. मनाने खचलो आम्ही, पण तरी जिद्द सोडली नाही. मग आम्ही पुन्हा दुसऱ्या दिंडीला विचारलं. रथामागील अकराव्या दिंडीने आम्हाला सन्मानाने बोलावलं. आता तर ते पालखी सोहळ्याच्या आधीच फोन करून तुम्हाला यायचंय बरं असं आग्रहाने सांगत आहेत.

मनाला खूप भारी वाटतंय. विठुनामाचा गजर करतो, भक्तीरसात चिंब भिजतोय, यापेक्षा आणखी काय हवं? आता सुद्धा अनेकांच्या वेगवेगळ्या आहेत. बघा, बघा असे म्हणून आमच्याकडे पाहतात. पण तरी त्यांचं काही सोयरसुतक आता वाटत नाही. येणाऱ्या काळामध्ये ही संख्या वाढेल. अधिकच वाढली तर दिंडीसुद्धा करण्याची आमची तयारी आहे. परंतु सगळ्यांचे एकमत होत नाही. अर्थात वारीत सहभागी झाल्यामुळे खूप आनंदी आहोत, असे दीपा नंदगिरी यांनी सांगितले. यातील कोणी किन्नर सोलापूरचे आहे, कोणी धाराशिवचे आहे, कोणी पुण्याचे आहे तर कोणी विदर्भातले. या मेळाव्यात या सर्वांना एकत्र आणले आहे.