Ashadhi Wari 2024: गजर ‘विठ्ठल’ नामाचा, सोहळा ‘आषाढी’ वारीचा, वारी कधीपासून आणि कुणी सुरू केली? वाचा सविस्तर

मुंबई : ”वैष्णवांचा मेळा सकळ मिळाला । विठ्ठलनामकाला पंढरीसी” संत निवृत्तीनाथांचा हा अभंग आपण अनेकदा ऐकला असेल. हाच वैष्णवांचा मेळा देहू,आळंदी मध्ये भरला आहे. दरवर्षी प्रमाणे आषाढी वारीला सुरवात झाली आहे. जगदगुरू संत तुकोबारायांच्या पालखीचे आज (28 जून ) देहूकडून पंढरपूरच्या दिशेकडे प्रस्थान झाले आहे. तर शनिवारी (29 जून) रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. राज्यातील लाखो वारकरी पंढरपूरच्या वारीमध्ये सहभागी होत असतात. हरिनामाचा गाजर करत भाविक पंढरीत दखल होतात. मग आता ही वारी कधीपासून सुरू झाली? कुणी सुरू केली? हे प्रश्न तुम्हालाही अनेक वेळा पडले असतीलच. चला तर जाणून घेऊ वारीबद्दलची सविस्तर माहिती..

800 वर्षांहून अधिक काळापासून वारी सुरू

पंढरपूरच्या वारीला महाराष्ट्रामध्ये खूप मोठं स्थान आहे. वारी ही आषाढी एकादशी आणि कार्तिकी महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन एकादशींना होत असते. एका सिद्धांतानुसार, श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचे वडील विठ्ठलपंत यांनी आषाढ आणि कार्तिक या महिन्यात पंढरपूरला जाण्यासाठी वारी सुरू केली. तब्बल 800 वर्षांहून अधिक काळापासून वारीची परंपरा असल्याचे सांगितले जाते. हिंदू वर्षानुसार आषाढ शुक्ल एकादशीच्या वेळी राज्यातील अनेक दिंडया या खेड्यापाड्यातून, शहरातून विठ्ठलांचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूर जात असत. संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील सुद्धा वारीला जात असे.

पूर्वीच्या काळी वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे लोक पायी पंढरपूरला जात असत. तीच परंपरा आजही सुरू आहे. पंढरपूरच्या वारीमध्ये लोक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. वारकरी पायी चालताना विठ्ठलाची भक्ती गीते गायन, नृत्य आणि टाळ नाद करत करत वारीचा आनंद घेत असतात.
Maharashtra Monsoon Budget 2024: ३ सिलेंडर फ्री, योजनांना वाढीव निधी, २५ लाख लखपती दिदी; अजितदादांकडून ताईंसाठी मोठ्या घोषणा

इ. स १६८५ मध्ये श्री संत तुकोबारायांचे घाकटे सुपुत्र नारायण बाबा यांनी संत तुकोबारायांच्या व संत ज्ञानेश्वरांच्या पालखीला ओळख दिली. नारायण बाबा यांनी संत तुकोबारायांच्या व संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका एकत्रितपणे पंढरपूरला घेऊन गेले. ही परंपरा 1930 पर्यंत सुरू होती. परंतु नंतर काही वादांमुळे पालख्या पुन्हा वेगवेगळ्या करण्यात आल्या.

दरवर्षी आषाढी वारी निमित्त संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या दिंडीप्रमाणे हजारो दिंडया पंढरपूरमध्ये दाखल होत असतात. या सर्व दिंडया पंढरपूरमध्ये जाण्याआधी वाखरी गावातील संतनगरी या ठिकाणी एकत्र येतात. आषाढ शुध्द दशमीच्या दिवशी एकमेकांना भेटून त्याच दिवशी संध्याकाळी सर्व वारकरी आणि आपापल्या दिंड्या हळूहळू पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतात.

पंढरपूरला पोहोचल्यानंतर ते चंद्रभागा नदीच्या पात्रात वारकरी स्नान करून प्रदक्षिणा पूर्ण करतात. पुंडलिका वरदा हरि विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल नामाचा जयघोष करतात.त्यानंतर एकादशीच्या दिवशी दुपारी विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तींची श्री राधारानीसह मिरवणूक निघते.हा संपूर्ण उत्सव आषाढ शुध्द पौर्णिमेच्या दिवशी संपतो त्याला ‘गोपालकाला’ असं देखील म्हंटलं जातं.