सेलमहून पुरवठा
उद्या, बुधवारी (१७ जुलै) आषाढी एकादशी साजरी होणार आहे. या मंगलदिनी बहुतांश जण उपवास करीत असल्याने दर वर्षी साबुदाणा आणि भगर या खाद्यपदार्थांना मोठी मागणी असते. तमिळनाडू येथील सेलम जिल्ह्यातून संपूर्ण देशात साबुदाण्याचा पुरवठा होतो.
दरांत तेजीचा प्रयत्न
आषाढी एकादशीसाठी महाराष्ट्रातून साबुदाण्याची मागणी वाढेल, अशी शक्यता गृहीत धरून सेलम जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी साबुदाणाच्या दरात तेजी आणण्याचा प्रयत्न केला. १५ ते २० दिवसांपूर्वी किलोमागे दोन ते अडीच रुपयांनी दरवाढ केली. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास २० टक्के मागणी कमी असल्याने चार दिवसांपूर्वी पुन्हा दरात किलोमागे एक ते दीड रुपयांनी घट झाली आहे.
रोज २५० टन आवक
भुसार बाजारात दररोज २०० ते २५० टन साबुदाण्याची आवक होत आहे. साधारण आवक यापेक्षा जास्त असते. भगरीचे आधीच वाढलेले दर कायम आहेत, अशी माहिती साबुदाणा, भगरीचे व्यापारी अशोक लोढा यांनी दिली. दर वाढल्याने भगरीलाही कमी मागणी असल्याचे लोढा यांनी सांगितले. मार्केट यार्डात नाशिक जिल्ह्यातून दररोज २५ ते ३० टन भगरेची आवक होत आहे.
शेंगदाण्याचीही मागणी मर्यादित
भगर आणि साबुदाण्याप्रमाणे शेंगदाण्याचीही मागणी मर्यादित आहे. आषाढी एकादशीच्या दरवर्षीच्या तुलनेत शेंगदाण्याला मागणी कमी असल्याचे मार्केट यार्डातील शेंगदाण्याचे व्यापारी गणेश चोरडिया यांनी सांगितले. आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश येथून बाजारात दररोज ६० ते ७० टन शेंगदाण्याची आवक होत आहे. स्पॅनिशच्या चांगल्या मालाला घाऊक बाजरात किलोला १२२ रुपये, घुंगरुला १०४ ते ११२ रुपये, एक क्रमांकाच्या शेंगदाण्याला १२० रुपये, दोन क्रमांकाच्या शेंगदाण्याला ११२ आणि तीन क्रमांकाच्या शेंगदाण्याला ९५ रुपये दर मिळाला आहे.
घाऊक बाजारातील साबुदाण्याचे प्रतिकिलोचे दर
साबुदाणा १ : ७२ ते ७५ रुपये
साबुदाणा २ : ६७ ते ७० रुपये
साबुदाणा ३ : ६२ ते ६५ रुपये
भगर : ९५ ते ११० रुपये
किरकोळ बाजारातील प्रतिकिलोचे दर
साबुदाणा : ९० आणि ९५ रुपये
भगर : १२० रुपये
शेंगदाणे : १४० रुपये