येत्या १७ जुलैला आषाढी एकादशीचा उत्सव आहे. मागील वर्षीसुद्धा राज्य सरकारने आषाढी एकादशीला जाणाऱ्या खासगी वाहनांवरील टोल माफ केला होता आणि सरकारच्या नियोजनाप्रमाणे मोठ्याप्रमाणात भाविक सुद्धा खासगी वाहनाने हजर झाले होते. हाच निर्णय लागू करत यावर्षी सुद्धा खासगी वाहने बस, टेम्पो, चारचाकी यांच्यावरील टोल माफ केला आहे. आजपासूनच पंढरपुराकडे जाणाऱ्या वाहनांना टोल भरावा लागणार नाही. ३ जुलै ते २१ जुलै दरम्यान कोणताही टोल भरावा लागणार नाही. शासनाच्या निर्णयामुळे वारकर्यांचा खिशावरील अतिरिक्त भार कमी होईल.
यामध्ये वारकऱ्यांचा वाहनांना परिवहन विभागातून विशेष स्टीकर देण्यात येतील. फक्त वारीनिमित्त निघालेल्या वाहनांनाच ही सवलत मिळणार आहे, तर पंढरपूरहून निघणाऱ्या सर्व वाहनांना सवलत लागू असेल. गरज असल्यास घाटातील अवजड वाहनांची ये जा बंद करा अशा सूचना सुद्धा स्थानिक प्रशासनाला मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. यामध्ये प्रामुख्याने सरकारने आणखी एक मोठी गोष्ट केली ती म्हणजे एसटी बसला सुद्धा टोलनाक्यावरील कर माफ करण्यात आला आहे. कारण राज्यातील दुर्गम भागांना लाल परी जोडते अनेक वारकऱ्यांना पैशांच्या अभावी खाजगी वाहने परवडत नाही अशावेळी त्यांचा प्रवासाचे साधन एसटी बस असते, त्यामुळे एसटी महामंडळांला सुद्धा टोल नाक्याच्या करातून सवलत देण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे.