माझ्या आयुष्यातलं पहिलं भाषण मी १९९१ ला फलटणमध्ये केलं होतं. तेव्हा पासुनच आम्हाला २५ ते ३० वर्ष चाललेले चुकीचं राजकारण पटत नव्हतं. त्याकाळी विकास आणि सामान्य माणूस नव्हे तर सत्ताच केंद्रबिंदू होती. या सगळ्या चाललेल्या चुकीच्या बाबी थांबवण्यासाठी आम्ही राजकारणात पडलो. आम्ही राजकारणात आल्यावर फलटणसाठी विकास केला. पाणी आणलं… मी अजूनही थकलेलो नाही. मात्र क्रिकेट खेळताना तरूणपणात पायाला लागलेलं होतं. त्यामुळं पायाचं दुखणं आता सुरु आहे. माझं वय ७७ आहे. त्यामुळे ते दुखणं त्रास देणारच.. पण माझं डोकं चालतंय त्याला काय करायचं? डोकं चालतंय तोपर्यन्त तुम्ही काळजी करु नका, खुर्चीत बसून संपवीन असा दमच राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांना दिला आहे. तुमच्या सगळ्यांच्या विश्वासाला पात्र राहून आम्ही काम केलं आहे. हा विश्वास घालवू नका एवढंच मी सांगतो असेही रामराजे यावेळी म्हणाले.
रामराजे पुढे म्हणाले की, आतापर्यंत जे केलं आहे, ते सांभाळायची कुवत कोणत्या कार्यकर्त्यांमध्ये आणि तालुक्याच्या नेतृत्वामध्ये आहे, हे आम्हाला जरा सांगा. आम्ही राजकीय भांडणं सोडवतो. आम्हाला कोणाबद्दल बोलायचं नाही. पण, हे सगळं गणित जे गेलं आहे. उरमोडी झालं नसतं तर माणला पाणी कुठून मिळालं असतं. जिहे काठापूरला अर्धा टीएमसी पाणी मी दिलं. पाणी म्हटलं की राजकारण आलंच. मला आता त्यात पडायचं नाही. आपण आपला तालुका सांभाळायचा असा इशारा देखील रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला आहे.
जनतेने आमच्यावर गेली ३० वर्षांपासून जो विश्वास टाकला आहे. तो विश्वास मात्र तेवढा घालवू नका, एवढीच आमची तुम्हाला विनंती आहे. राज्यात आपण मतं मिळवायला कमी पडलो आहोत, पण कामांमध्ये आपण कुठेही कमी पडलेलो नाही. त्या कामाची मते मिळविण्यात आम्ही कमी पडलेलो आहोत. राज्यातील दोन मोठे पक्ष आपल्या विरोधात होते, असेही रामराजे निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.