बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी 4500 पानी आरोपपत्र दाखल केलय. त्यातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. माजी आमदार आणि बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकीने यात अनिल परब यांचं नाव घेतलय. अनिल परब यांनी आज यावर स्पष्टीकरण दिलं. झिशान सिद्दीकीने त्याच्या जबाबात या प्रकरणाला SRA शी जोडण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्या वडिलांच्या हत्येमागे एसआरएचा अँगल असल्याची त्याची भावना आहे. “आम्ही ज्या एसआरए बैठकीला गेलेलो, तिथे कृणाल सरमळकर होते. मनसेचे पदाधिकारी होते. ही सर्वपक्षीय सभा होती. पोलिसांनी कधीही चौकशी करावी बाकीचे अँगल तपासून बघा. आरोप करुन चालणार नाही, आरोप सिद्ध करावे लागतील. बाबा सिद्दीकींचे कोणाशी संबंध होते? कशा संदर्भात बोलण झालं? ते तपासलं पाहिजे” असं अनिल परब म्हणाले.
झिशान सिद्दीकीचे जे स्टेटमेंट दिलय, त्यामागे कुठलं राजकारण आहे का? यावर अनिल परब म्हणाले की, “हे सगळं राजकारण आहे का? किंवा काय हे त्यालाच माहिती. वस्तुस्थिती बाहेर येऊ नये, म्हणून कदाचित SRA चा अँगल लावला जात असेल. मी टीव्हीवर बातमी पाहिलेली, छोटा शकिलने धमकी दिलेली. छोटा शकीलने बाबा सिद्दीकींना धमकी का दिलेली हे तेच लोक सांगू शकतात. कारण त्यांचे व्यवहार काय होते, ते आम्हाला माहित नाही. मग अशा गोष्टी लपवण्यासाठी हा अँगल बदलला जातोय का? याचा देखील तपास पोलिसांनी करावा”
त्या व्यतिरिक्त खून होण्याचं दुसरं कारण काय?
खरी वस्तुस्थिती तुम्ही म्हणताय, तुमची माहिती काय आहे? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. “मला माहिती नाही, यांचे काय व्यवहार आहेत? बाबा सिद्दीकींना मी ओळखायचो. झिशानला सुद्धा ओळखतो. यांचे व्यवहार माहित नाहीत. एखाद्याचा खून होतो, चार-पाच गोष्टी असतात. व्यक्तीगत दुश्मनी, मालमत्तेची भानगड, पैशाची भानगड किंवा बाईवरुन भानगड त्या व्यतिरिक्त खून होण्याचं दुसरं कारण काय?. या हत्येच कारण पोलिसांनी बाहेर आणलं पाहिजे” असं अनिल परब म्हणाले. पोलिसांनी सत्य बाहेर आणलं पाहिजे. झिशानच समाधान होत नसेल, तर त्याने पुन्हा चौकशीची मागणी करावी असं अनिल परब म्हणाले.