“मी आरोपपत्र वाचलेलं नाही. पण पोलिसांना तपासत जे आढळलं, ते पोलिसांनी लिहिलेलं असेल. त्यातूनही झिशान सिद्दीकीच समाधान झालेलं नसेल, त्याचा काही वेगळा अँगल असेल, सरकार त्यांचच आहे. त्याने सरकारकडे पुन्हा तक्रार करावी. पोलीस पुन्हा चौकशी करतील. यात सत्य अजून काही लपलेलं असेल, ते त्याला माहित असेल, कोणा-कोणाचे त्याच्या वडिलांना फोन येत होते. अशा बातम्या सतत टीव्हीवर येते होत्या. छोटा शकीलने त्याच्या वडिलांना धमकी दिली ही बातमी मी टीव्हीवर पाहिलेली. असं काय असेल ते अँगल तपासून बघितले पाहिजेत” उद्धव ठाकरे गटाचे नेते असं अनिल परब म्हणाले. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात झिशान सिद्दीकीने अनिल परब यांचं नाव घेतलं आहे.
“सरकार, पोलीस त्यांचेच आहेत. त्यांची अजूनही काही तक्रार असेल तर त्यांनी पोलिसांकडे जावं. त्यांच्याच पोलिसांवर त्यांचा अविश्वास असेल, तर यात मी काही करु शकत नाही. यात त्याचं समाधान होत नसेल, तर त्याने पुन्हा एकदा दाद मागवी” असं अनिल परब म्हणाले. पत्रकारांनी त्यांना विचारलं की, त्याचा असा समज असा आहे की पृथ्वी चव्हाण बिल्डरला तुम्ही आणलं. त्या बिल्डरने फसवलं असं त्याचं म्हणणं आहे.
जीबीआरमध्ये रेकॉर्डिंग आहे
“जीबीआर झाली आहे. त्या जीबीआरमध्ये रेकॉर्डिंग आहे. ते रेकॉर्डिंग एसआरएला जातं. एसआरएचे अधिकारी त्याची दखल घेतात. या सगळ्याचा कुठेना कुठे उल्लेख असेलच ना. बिल्डरला आम्ही सगळेच ओळखतो. बिल्डर आम्ही आणत नाही, लोक आणतात. त्यांनी आम्हाला निमंत्रित केलं होतं. त्या सभेला आम्ही उपस्थित होतो. त्यात गैर काय?” असा सवाल अनिल परब यांनी केला.
अदानीच पण नाव आहे
ज्ञानेश्वर नगरच्या विकासासाठी खासगी बिल्डरला आणण्याचा तुमचा प्रयत्न होता. मोहित कंबोज यांचं बाबा सिद्दीकींच्या हत्येच्या अर्धातास आधी व्हॉटस अॅपवर बोलणं झालं होतं. 11 बिल्डरची नाव दिली आहेत, या प्रश्नावर अनिल परब म्हणाले की, “याची चौकशी करावी. हे 11 बिल्डर कोण आहेत? त्यांची नाव काय आहेत? त्या सगळ्याची चौकशी पोलिसांनी करावी. माझ्या माहितीप्रमाणे अदानीच पण नाव आहे. त्याला देखील बोलवावं. बाबूलाल वर्मा, शिवालीक वेंचर, पृथ्वी चव्हाणच नाव आहे. माझ मत असं आहे की, या सगळ्यांना बोलावून तपासून घ्या. पोलिसांनी पूर्ण तपास करावा. यात कुठलीही आडकाठी येऊ नये, सत्य समोर येऊद्या” असं अनिल परब म्हणाले.