नागरी लष्करी समन्वयाबाबत फडणवीसांच्या उपस्थितीत ‘वर्षा’वर महत्त्वाची बैठक

नागरी लष्करी समन्वयाबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह तीनही दलाचे अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी ही बैठक पार पडली. राज्य सरकार अधिक सन्मवयानं काम करणार असल्याचं या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

या बैठकीला लष्कराचे लेफ्टनंट जनरल पवन चढ्ढा, लष्कराचे कर्नल संदीप सील, नौदलाचे रियर अॅडमिरल अनिल जग्गी,  नौदलाचे कमांडर नितेश गर्ग, वायूदलाचे एअर वाईस मार्शल रजत मोहन, एटीएसचे प्रतिनिधी, होमगार्डचे प्रतिनिधी, रिझर्व्ह बँकेचे प्रतिनिधी, जेएनपीटीचे प्रतिनिधी, बीपीटीचे प्रतिनिधी,  मुंबई स्टॉक एक्सचेंजचे प्रतिनिधी, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे प्रतिनिधी, यांची उपस्थिती होती.

बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? 

या बैठकीमध्ये गुप्तचर माहितीचे आदानप्रदान झाले,  तंत्रज्ञानाचा अधिक वापर आणि काय खबरदारी घ्यायची यावर चर्चा झाली, संरक्षण दलांना राज्य सरकारतर्फे अपेक्षित सहकार्य आणि अधिक गतीची समन्वय यंत्रणा उभारण्यावर यावेळी चर्चा झाली आहे.

फडणवीसांनी काय म्हटलं? 

भारतीय सैन्यानं ताकदीने आणि अधिक अचूकपणे ऑपरेशन सिंदूर राबल्याचं फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे. ऑपपेशन सिंदूर अभूतपूर्व आहे, संरक्षण दलाला मी सॅल्युट करतो
मुंबईसारखे शहर हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे, देशाची आर्थिक राजधानी आहे. यापूर्वी मुंबईवर हल्ले झाले, तेव्हा शत्रूकडून आम्ही भारताच्या आर्थिक राजधानीवर हल्ला केला हे दाखवण्याचा प्रयत्न झाला. या स्थितीत गुप्तचर माहितीचे आदानप्रदान हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
येणाऱ्या काळात संपूर्ण ताकदीने काम करावे लागेल,  सायबर सुरक्षेबाबत सर्वांनाच अधिक काळजी घ्यावी लागेल, राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि संरक्षण दलाचे अधिकारी मिळून अधिक समन्वयानं एकत्रितपणे काम करू असं फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे.

सात मे रोजी भारतीय सैन्यदलाकडून पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानात ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं, पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करण्यात आला, या हल्ल्यात 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)