Amol Kolhe : अमोल कोल्हेंनी वर्तवलं भाकीत, मविआला आगामी विधानसभेत इतक्या जागा मिळणार

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस ( शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकासआघाडीला 180 पेक्षा जास्त जागा मिळतील. असा विश्वास व्यक्त केला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुका पार पडल्या असून राज्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं आहे. तर महायुतीला विशेषतः भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) यांना अपयश आलं आहे. अशातच आता सर्वांनाच आगामी विधानसभा निवडणुकींचे वेध लागले आहे. पुढील तीन ते चार महिन्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे.

लोकसभेच्या निकालावरून महाविकास 155 जागांवर आघाडीवर

खासदार अमोल कोल्हे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली यावेळी महाविकास आघाडीला किती जागा मिळतील? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना अमोल कोल्हे म्हणाले की, ”लोकसभेचा निकाल पाहता सध्या महाविकासआघाडी 155 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे विधानसभेमध्ये 180 ते 190 जागांपर्यंत जायला हरकत नाही”.

Ashadhi Wari: अपार भक्तीचा सोहळा रंगला, हरिनामात तल्लीन झाले किन्नर वारकरी

देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटले जात आहेत

अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल देखील वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, ” राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लढल्या जाणार होत्या. मात्र, दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांचे पंख छाटण्याचे काम सुरू झाले आहे”.

आरक्षणावरुन जनतेच्या मनात संभ्रम पसरवू नये

राज्य सरकारने मंगळवारी मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. परंतु या बैठकीला महाविकासआघाडीचे नेते उपस्थित नव्हते. यावरून महायुतीने महाविकासआघाडीवर टीका केली. याला खासदार अमोल कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, ” सरकारने जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करू नये. महाविकासआघाडीची भूमिका स्पष्ट असून यातून सक्षम तोडगा समोर आणावा. सर्व घटकांना योग्य न्याय मिळेल असा तोडगा सरकारने काढावा”.

दरम्यान, आज विधानभवनात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात मोठा गोंधळ झाला. तसेच दोन वेळा सभागृहाचे कामकाज थांबवण्यात आले.