Ambadas Danave: दानवेंवरील कारवाईला कात्री, दिलगिरी व्यक्त केल्याने सभागृहाचा निर्णय

प्रतिनिधी, मुंबई: सध्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशात रोज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे. त्यातच विरोध पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबनाने वेगळाच वाद उद्भवला होता. विधान परिषदेत आमदाराविषयी अपशब्द वापरल्याबद्दल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने त्यांच्या निलंबनाचा कालावधी पाचवरून तीन दिवस करण्याचा ठराव गुरुवारी मंजूर करण्यात आला. त्यामुळे दानवे हे शुक्रवारपासून कामकाजात सहभागी होऊ शकतील.

राहुल गांधीच्या भाषणावरुन विधान परिषदेत गोंधळ

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भाषणावरून सोमवारी विधान परिषदेत शाब्दिक चकमकीदरम्यान अंबादास दानवे यांनी आमदार प्रसाद लाड यांच्याविषयी अपशब्द उच्चारले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दानवे यांच्या पाच दिवसांच्या निलंबनाचा प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला. तो बहुमताने मंजूरही झाला.

उद्धव ठाकरेंकडून निलंबनाचा निषेध, माफीही मागितली

त्याच दिवशी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या निलंबनाचा निषेध केला. तसेच, दानवे यांच्या वर्तनामुळे राज्यातील माता-भगिनींची माफीही मागितली होती. त्यानंतर, बुधवारी दानवे यांनी सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना पत्र लिहून झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. आमदार अनिल परब यांनी या पत्रानंतर निलंबनावर फेरविचार करावा, अशी मागणी केली होती. त्यावर अंबादास दानवे यांच्या निलंबनाबाबत फेरविचार करण्याबाबत गुरुवारी ठराव आणण्याचे ठरले आहे.

प्रसाद लाड यांच्याकडून निलंबनावर फेरविचार करण्याची विनंती

आमदार प्रसाद लाड यांनी गुरुवारी सकाळी निवेदन करत दानवे यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने त्यांच्या निलंबनाच्या फेरविचारावर सरकार जो निर्णय घेईल, तो मान्य असल्याचे स्पष्ट केले होते. अधिवेशन काळात विरोधी पक्षनेता सभागृहात असणे गरजेचे असून, त्याशिवाय अर्थसंकल्पाविषयक आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणे अशक्य असल्याचा सूर उमटला. त्यानुसार, गुरुवारी दुपारी संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निलंबनाचा कालावधी पाच दिवसांवरून तीन दिवसांवर करण्याचा ठराव सभागृहात मांडला. हा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला आहे.