सध्या सोन्याचा भाव प्रतितोळा (१० ग्रॅम) ७१ हजार रुपये असल्याने या माध्यमातून ६५० ते ७०० कोटी रुपयांच्या उलाढालीची चिन्हे आहेत. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यंदाच्या अक्षय्य तृतीयेला सोन्याच्या खरेदीत लहान दागिने व नाण्यांना सर्वाधिक मागणी दिसून येत आहे. नाण्यांवर घडणावळ शुल्क नसते व दागिन्यांवर ते कमी असते. त्यामुळेच भाव कमी झाले असले तरी खर्च टाळण्यासाठी सोनेखरेदीला सर्वाधिक मागणी दिसून येत आहे.
रिअल इस्टेटमध्येही ऑफरमुळे मागणी
भारतीय संस्कृतीत अक्षय्य तृतीयेच्या दिवशी खरेदीला महत्त्व आहे. ही संधी साधत अनेक विकासक व बांधकाम व्यावसायिकांनी अनेक ऑफर आणल्या आहेत. १० टक्के भरून दोन वर्षे ‘नो ईएमआय’, मुद्रांकशुल्क माफ, जीएसटी माफ, २५-२५-२५-२५ योजना, २०-२०-४०-२० योजना, मॉड्युलर किचन मोफत अशा योजनांचा लाभ घेण्यासाठी गृहखरेदीदारांकडून अक्षय्य तृतीयेनिमित्त विचारणा वाढल्याचे बिल्डर कंपन्यांच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे.
चांदीला झळाळी
सोने व चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या व्यवसायासाठी नवे वर्ष अक्षय्य तृतीयेला साधारणपणे सुरू होते असे मानले जाते. ही बाब गृहीत धरल्यास मोतिलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या अंदाजानुसार, चांदीच्या मागणीत मोठी वाढ अपेक्षित आहे. सोने आणि चांदी यांच्या वाढीचे प्रमाण पाहिल्यास आजपर्यंत हे दोन्ही मौल्यवान धातू अनुक्रमे १३ टक्के आणि ११ टक्के वधारले आहेत. दोन्ही धातूंचे भाव सातत्याने वाढताना दिसत आहेत. आगामी काळात सोने प्रति १० ग्रॅम ७५ हजार रुपयांपर्यंत आणि चांदी प्रतिकिलो एक लाख रुपयांपर्यंत जाईल, असे भाकीत मोतिलाल ओसवालने केले आहे.