पुण्यात वर्दळीचे स्वारगेट एसटी स्टँडवर शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाला. सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. पीडित तरुणी पुण्याहून फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर आली होती त्यावेळी ही घटना घडली. स्वारगेट पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय रामदास गाडे असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांची आठ पथके त्याचा शोध घेण्यासाठी रवाना झाले आहेत. आता याप्रकरणी पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पुण्यातील घटनेबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. काहीही करुन तो आरोपी सापडला पाहिजे. त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.
काल सकाळी पहाटे पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँडवर एक अतिशय दुख:द, दुर्भाग्यपूर्ण घटना घडली. त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनला ९.३० वाजता तक्रार मिळाली. पोलिसांचा तपास सुरु आहे. माझं सीपींशी बोलणं झालं आहे. त्यात संशयितदृष्ट्या फिरणारा आरोपी हा शिरुर तालुक्यातील आहे. या प्रकरणी एकाला ताब्यात घेतलंय, पण तो अजून सापडलेला नाही. पोलीस शिरुर आणि त्याच्या गावी तपास करत आहेत, अशी माहिती अजित पवारांनी दिली.
त्याला फाशीची शिक्षा करणार…
महाराष्ट्रात ही अशी दुर्दैवी घटना घडणं अतिशय क्लेशदायक आहेत, याबद्दल कोणाचंच दुमत असण्याचे कारण नाही. पण आपण सर्व काळजी घेण्याचा प्रयत्न करतोय, तरी या घटना घडत आहेत. सर्व सीसीटीव्हीची बारकाईने पाहणी करायला सांगितली आहे. तिथे सीसीटीव्हीत प्रवासीही दिसतात. स्वारगेट आणि शिवाजीनगर या बस डेपोत ठिकाणी वर्दळ असते. काहीही करुन तो आरोपी सापडला पाहिजे. त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. ज्या मुलीवर हा प्रसंग उद्भवला आहे त्या मुलीच्या बाबतीत ज्या काही गोष्टी करायची आहे ते करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री असल्याने मलाही ती गोष्ट ऐकल्यानंतर अतिशय मनस्ताप झाला, असेही अजित पवार म्हणाले.
तो मुलगा ताब्यात आल्यानतंर ताबडतोब कारवाई करणार…
सूसंस्कृत महाराष्ट्राला आणि पुणेकरांना कोणालाही पटणारी नाही. तिथे जवळ पोलीस चौकीदेखील आहे. तो मुलगा ताब्यात आल्यानंतर त्याच्यावर ताबडतोब कारवाई करायची, कशी करायची, ही केस लवकर कशी चालेल याबद्दल सगळी खबरदारी घेत आहोत, असेही अजित पवारांनी सांगितले.