Bacchu Kadu : प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी सत्ताधारी महायुतीवर कठोर शब्दांत टीका केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी, काश्मीर हल्ला अशा सर्व विषयांवर त्यांनी भाष्य केलं. अमरावतीमध्ये प्रहार पक्षाचा एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात बच्चू कडू यांच्या हस्ते प्रहारचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संताजी आणि धनाजी पुरस्कार देण्यात आला. याच कार्यक्रमात बच्चू कडू बोलत होते.
संघटना कशी वाढली पाहिजे यासाठी मी एका टीव्हीवर सिरीयल पाहिली आणि संतांजी धनाजी पुरस्कार कार्यकर्त्यांना दिला पाहिजे, असे मला वाटले. कारण कार्यकर्त्यांशिवाय पक्ष चालूच शकत नाही. त्यामुळे त्यांचा सन्मान करायचं आम्ही ठरवलं, अशी माहिती कडू यांनी दिली.
तीन बंदरासारखी व्यवस्था…
“गिरता वही है जो रुकता है. बच्चू कडू रुकने वाला नही है. दौडने वाला है. पराभव झाला हे डोक्यातून काढून टाका. अजित पवार म्हणतात सरकारकडे पैसे नाहीत. देवेंद्र फडणवीस हे बोलायला तयार नाहीत. एकनाथ शिंदेंना तर कानच राहलेले नाहीत. तीन बंदरासारखी व्यवस्था निर्माण झाली आहे. एकाचे डोळ्यावर बोट आहे, एकाचे कानावर बोट आहेत आणि एकाचे तोंडावर बोट आहे,” अशी टीका बच्चू कडू यांनी केली.
मी सांगतो बच्चू कडू धावणारा आहे पडणारा नाही. मतांची चोरी ज्यांनी केली ते चोराची औलाद. भारताची अर्थव्यवस्था ही जगात तिसऱ्या स्थानी आहे पण अजूनही गरिबाला घर नाही. अजितदादाला 55 हजार पगार होता. आज मात्र अजित पवार अडीच लाख रुपये मानधन उचलतात, असाही हल्लाबोल त्यांनी केला.
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाल्याशिवाय…
आमदाराला तीन हजार रुपये रोज आणि MRGS मजुराला फक्त 200 रुपये रोजंदारी दिली जाते. निवडणुकीत फडणवीस म्हणाले होते की, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाल्याशिवाय राहणार नाही. आता मात्र अजितदादा बोलत नाहीत, फडणवीस तर काहीच बोलायला तयार नाही आणि शिंदें साहेबांना काहीच ऐकायला येत नाही. ह्या तिन्ही बंदरांना काहीच दिसत नाही, ऐकू येत नाही, अशी खोचक टीका बच्चू कडू यांनी केली.
…किमान आता वेळ तरी मिळत आहे
56 इंचापेक्षा आमच्या कार्यकर्त्यांची छाती मोठी आहे. 75 वर्ष काँग्रेसचे गेले आणि 20 वर्षे भाजपाचे गेले. पण अजूनही देशाची अवस्था जशीच्या तशीच आहे. बरं झालं मी निवडणुकीत पडलो, किमान आता वेळ तरी मिळत आहे. बच्चू कडूची ताकत बच्चू कडूमध्ये लपली आहे आमदारकीमध्ये नाही. अजित पवार, पंकजा मुंडे, संजय राठोड यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन करणार आहोत, असा इशारीही त्यांनी दिला.
15 दिवसांत तारीख नाही सांगितली तर…
5 जूनला आपण मोटारसायकल किंवा गाडीने यवतमाळला ताकतीने जाणार आहोत. तिथून आपण नागपुरात जाऊन देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर जाणार आहोत. पालकमंत्री बावनकुळे म्हणतात आम्ही कर्जमाफी देऊ पण तारीख सांगत नाहीत. जर 15 दिवसांत तारीख नाही सांगितली तर तुमचे चाक आम्ही अडवू. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे समाधीस्थळ असलेल्या मोझरीला 7 जून पासून मी उपोषणाला बसणार आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीच तोपर्यंत मी त्याठिकाणीच थांबणार आहे, असा थेट इशाराही बच्चू कडू यांनी दिला.
जिथे अतिरेक्यांनी हल्ला केला त्याठिकाणी जर आपले दोन-तीन जवान असते तर त्यांचा तिथंच खात्मा झाला असता. जिथं गर्दी होती. त्याठिकाणी सुरक्षा नव्हती. म्हणतात मी चौकीदार आहे. पण यांच्या काळातच सर्वाधिक भ्रष्टाचार झाला आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.