Ajit Pawar : ओबीसी जर एकवटला तर कोण अजितदादा? या ओबीसी नेत्याने डागली तोफ, म्हणाले सत्ता मिळत नसेल तर हिसकावून घेऊ

छगन भुजबळ नाराज आहेत. मंत्रिमंडळात त्यांचा समावेश नाही. राज्यात महायुतीचे सरकार आणण्यात, ओबीसींना एकवटण्यात आपल्या नेत्याचा सिंहाचा वाटा असताना त्याला सत्तेतील वाटेकरी न केल्याने ओबीसी नेत्यांचा संताप अनावर झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटातील ज्येष्ठे नेते यांना कॅबिनेट मिळणार असा अनेकांचा व्होरा होता. पण अजित पवार गटाच्या 9 आमदारांच्या यादीत त्यांचे नाव नव्हते. त्यानंतर भुजबळ यांनी मेळावा घेत नाराजी जाहीर केली. त्यावर आता ओबीसी नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. काय म्हणाले लक्ष्मण हाके?

भुजबळांवर हा तर अन्याय

भुजबळ यांना मंत्रीपद न दिल्याने ओबीसी गोटातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सुद्धा संताप व्यक्त केला आहे. भुजबळांवर निश्चित अन्याय झाला आहे. अन्याय का केला गेला आहे आणि कोणाकडून केला गेला आहे याचे संशोधन होणे गरजेचे आहे. ओबीसींच्या बाजूने त्यांनी ठाम भूमिका घेतली आहे, असे हाके म्हणाले.

अजितदादांवर तिखट प्रतिक्रिया

तुम्ही ओबीसी विरोधी आहात या प्रश्नाला अजितदादांना सामोरे जावे लागणार आहे, असे ते म्हणाले. भुजबळांवरती अन्याय झाला आहे असं मानणारे आम्ही आहोत. ओबीसी जर एकवटला तर कुठला अजितदादा आणि कोण अजितदादा? असा टोला त्यांनी लगावला. अजित दादा ज्या मतदारसंघातून निवडून येतील तिथल्या लोकांना पण आम्हाला सांगावे लागेल. तुम्ही ज्या दिवट्याला निवडून देताय तो दिवटा ओबीसींना खाली बसतोय घरी बसवतोय, अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी दिली.

मनोज जरांगे यांना इशारा

यावेळी लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांना सुद्धा इशारा दिला. मनोज जरांगेंनी किती वेळा आंदोलन करावं. त्या आंदोलनामध्ये किती खोली आहे याचाच जरांगेंनी एकदा कोणाकडून तरी सल्ला घ्यावा, असा चिमटा त्यांनी काढला. अशा गोष्टी करण्यापेक्षा जरांग्यांनी काही लोकांचं ऐकावं सल्ला घ्यावा आणि मग आंदोलन करावे असे ते म्हणाले.

ओबीसीला दिलेलं आरक्षण हे मराठ्याच्या अवनीतीचे कारण आहे असं जर जरांगे म्हणणार असतील तर जशास तसे उत्तर आम्ही ओबीसी म्हणून देणार आहोत. ओबीसी मधूनच आम्हाला आरक्षण पाहिजे अशी बावळट मागणी जर जरांगे करत असतील. जरांगेची जशी मागणी असेल त्यापेक्षा दुप्पट ॲक्शन ओबीसीची असेल, असा इशारा हाके यांनी दिला. राजसत्तेत जायला आम्हाला नक्कीच आवडेल, मिळत नसेल तर हिसकावून घेऊ असे ते म्हणाले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)