लोकसभा निवडणुकीच्या निराशाजनक कामगिरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगलाच कामाला लागला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार लवकरच राज्यव्यापी दौरा काढणार असून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेही १९ जूनपासून तीन दिवसीय दौरा करणार आहेत. निवडणुकीच्या काळात अजित पवार यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आले आणि त्याला उत्तर देण्यात आम्ही कमी पडलो आणि विरोधकांना त्यात यश मिळाले, या गोष्टीही विचारात घेऊन आम्ही पुढील नियोजन करत आहोत, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.राष्ट्रवादी काँग्रेसने आता विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले असून ‘एकच लक्ष्य विधानसभा क्षेत्र’ हे घोषवाक्य घेत प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी १९ जून ते २१ जून दरम्यान राज्यव्यापी दौऱ्याची बुधवारी घोषणा केली. दौऱ्याची सुरुवात शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापनदिन झाला त्या अहमदनगर येथूनच होणार असून सलग तीन दिवसांच्या या दौऱ्यादरम्यान वेगवेगळ्या राजकीय लोकांचे पक्षप्रवेशही होणार आहेत.
शेतकऱ्यांच्या मनात कांदा, सोयाबीन, कापूस हे सर्व प्रश्न एकाचवेळी निर्माण झाले आणि त्याचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही याची जाणीव असल्याचे सुनिल तटकरे यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत एक नकारात्मक भावना निर्माण करण्यात आली. काही ठिकाणी सहानुभूती अनुभवण्यात आली, असे तटकरे म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत मतदानाचा दिवस जसा जवळ येत गेला तसा अजित पवार यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी एक विशेष मोहीम जाणीवपूर्वक राबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यात यश आले, हे मी नाकारत नाही किंवा ती बाजू समजावण्यात आम्ही कमी पडलो असे स्पष्ट करतानाच गेले सात – आठ दिवस जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्याबाबतीत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आता काम करत आहोत, हेही आवर्जून तटकरे यांनी सांगितले.
यंदा महाराष्ट्रात गेली २५ वर्षे अविरत २४ तास राबणाऱ्या अजित पवारांच्या पाठीशी सहानुभूती तयार होईल आणि महायुती म्हणून आम्ही निवडणूकीला सामोरे जाऊ, असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर अजित पवार यांच्या राज्यव्यापी दौर्याचे नियोजन करत आहोत, असेही सुनिल तटकरे यांनी जाहीर केले.