काळ-वेळ कुणाकरिता थांबत नसते, बघता बघता पक्षाला स्थापन होऊन २५ वर्षे पूर्ण झाली. परंतु, पक्षाला नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे चांगले यश मिळाले नाही. परंतु, पक्षाचा पाया भक्कम असेल तरच सर्व चढ-उतारांत खंबीर राहू शकतो, एकदिलाने लढलो तर पुन्हा विजयाची पताका विधानसभेवर फडकेल, असा दृढविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी पक्षाचा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन शीव येथील षण्मुखानंद सभागृहात सोमवारी दुपारी पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या भाषणाने झाली. भाषणात अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नवी भरारी घेईल असा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्रात नवीन अजितपर्व सुरू झाले आहे, हे विश्वासघाताचे नाही तर विश्वासार्हतेचे पर्व आहे, असे म्हणाले. पक्षातील प्रत्येक नेत्याने झोकून देऊन काम केले तर परिस्थिती नक्कीच बदलेल. एकच लक्ष्य, विधानसभा क्षेत्र हे ब्रीदवाक्य घेऊन आपल्याला पुढे काम करायचे आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवायचे असून त्यासाठी जिद्दीने वाटचाल करुयात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तर, आगामी विधानसभा निवडणूक महायुती म्हणूनच सामोरे जायचे आहे, असे पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले. पुढच्या १२० दिवस आपण चांगले काम केले तर सध्या झालेले नुकसान भरुन काढू शकतो, असा विश्वास पटेल यांनी वर्तवला. मागील विधानसभा निवडणुकीत आपले ५३ आमदार निवडून आले होते, विधानपरिषदेचे पकडले तर ६० च्या आसपास आमदार असून १०० च्या आसपास विधानसभा क्षेत्र आपण शोधून ठेवायला हवेत, असेही त्यांनी सूचविले.
काळ वेळ कुणाकरता थांबत नसते, बघता बघता २५ वर्षे झाली, या काळात पक्षाने अनेक आमदार, खासदार दिले, याची आठवण अजित पवार यांनी करुन दिली. लोकसभा निवडणुकीत आपली कामगिरी समाधानकारक झाली नाही, पण सुनील तटकरे यांनी पक्षाची लाज राखली. सध्या पक्षाकडे संसदेत लोकसभा आणि राज्यसभेत एक खासदार असून जुलैअखेर किंवा ऑगस्टपर्यंत राज्यसभेत ३ खासदार होतील, असे पवार यांनी स्पष्ट केले.
राज्यात मुस्लिम, आदिवासी महामंडळांना कोट्यवधी रुपये दिले, निधी कुठेही कमी पडू दिला नाही तरीही विधानसभेच्या निवडणुकीत आपल्यातून जो घटक दूर गेला आहे, जो समाज आपल्यापासून अंतर ठेवत आहे, ते अंतर कमी करायला हवे, याकडे पवारांनी लक्ष वेधले. शिव-शाहु-फुले-आंबेडकर ही पक्षाची विचारधारा होती, आहे आणि राहिल यात कोणीही शंका घेण्याचे कारण नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले. देशाचा आणि राज्याचा विकास विचार करुन आपण महायुतीत सहभागी असलो तरीही पक्षाच्या विचारधारेला कुठेही अंतर पडू देणार नाही, असे त्यांनी अधोरेखित केले.
परंतु, यापुढे नव्या रक्ताला पक्षाला वाव मिळेल यासाठी जातीने लक्ष घालू, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला तर यापुढे तीन दिवस मुंबईत तर चार दिवस पक्षाच्या कामानिमित्त दौऱ्यावर राहू असे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना हव्या असलेल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. परंतु, त्याचा वापर केवळ पक्षाच्याच कामासासाठी वापरावे, असा सज्जड दमही त्यांनी केला. एकदिलाने लढलात तर पुन्हा विजयाची पताका विधानसभेवर फडकेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पवारांविषयी कृतज्ञता व्यक्त
भाषणात अजित पवार यांनी २४ वर्षे पक्षाला समर्थ नेतृत्व दिलेल्या शरद पवार यांच्याविषयी स्वतःतर्फे आणि पक्षातर्फे कृतज्ञता व्यक्त केली. तसेच पक्षाच्या वाटचालीत महत्त्वाचे शिलेदार असलेल्या पी. ए. संगमा, आर. आर. पाटील, दिग्विजय खानविलकर, बाबासाहेब कुपेकर यांच्या स्मृतींनाही पवार यांनी उजाळा दिला.