राज्यात भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व असतानाही केवळ अजित पवार ‘महायुती’मध्ये सहभागी झाल्याने हिरावला गेलेला चंद्रकांत पाटील यांचा ‘पालकमंत्री’पदाचा कारभार अजितदादांकडे राहणार का, याची सर्वांना उत्सुकता आहे.
पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघांमधील बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे सर्वच देशवासीयांचे लक्ष लागले होते. अजित पवार महायुतीत दाखल झाल्यानंतर बारामतीत सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार लढणार हे स्पष्ट झाले होते. महायुतीत अजित पवार यांच्या वाटेला चार जागा आल्या होत्या. त्यापैकी पक्षाने सर्वाधिक लक्ष बारामतीच्या जागेवरच केंद्रित केले होते. या जागेसाठी अजित पवार शेवटचे काही दिवस बारामतीतील सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये अक्षरश: तळ ठोकून होते. त्यांना भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही महायुतीतील मित्रपक्षांची साथ लाभली होती. त्यामुळे बारामती मतदारसंघावरील शरद पवार यांचे वर्चस्व मोडून काढण्यात यश येईल, असा अजित पवार यांच्याप्रमाणेच भारतीय जनता पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा अंदाज होता. दुर्दैवाने, मंगळवारी झालेल्या मतमोजणीनंतर सारेच अंदाज फोल ठरले असून, सुनेत्रा पवार यांच्या पराभवामुळे अजित पवार यांना जबरदस्त धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे रायगडमधून पुन्हा विजयी होत असताना बारामतीत सुनेत्रा यांचा मोठा पराभव झाल्याने मंगळवारी संपूर्ण दिवसभरात अजित पवार एकदाही माध्यमांसमोर आले नाहीत.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर बारामती कोणाची? या संघर्षामध्ये दोन्ही बाजूंनी प्रचाराचा धुराळा उडाला होता. शरद पवार यांच्या वयाचा आधार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून भावनिक प्रचार केला गेला, तर अजित पवार यांनीही सुप्रिया सुळे यांच्या कारभारावर टीका करून सुनेत्रा यांना निवडून देण्याचे आवाहन केले होते. अजित पवार यांच्याकडून काहींना दमदाटी केली जात असल्याची तक्रार पवार गटाकडून केली जात होती. त्याच वेळी अजित पवार वगळता पवार कुटुंबातील सर्व जण शरद पवार यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असल्याचे चित्र निर्माण झाले होते. अनेकांनी अजित पवार यांच्यावर आरोप करून टीकेची झोड उठवली होती. त्यामुळे ही निवडणूक वैयक्तिक पातळीवरील दोषारोपांची झाली. निवडणूक चुरशीची झाली; पण मतमोजणीदरम्यान ही चुरस कुठेच दिसली नाही.
पुन्हा नव्याने सुरुवात
पुण्याचे पालकमंत्रीपद सांभाळणाऱ्या अजित पवार यांना विधानसभेसाठी आता नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. पक्षातील सर्व आमदार, पदाधिकारी यांना बळ देतानाच, महाविकास आघाडीशी दोन हात करताना त्यांना सर्वस्व पणाला लावावे लागेल. पवार यांचा एकूण स्वभाव पाहता, पत्नीचा पराभव मागे सोडून कदाचित उद्या, बुधवारपासून सकाळी ते पुन्हा विविध ठिकाणी गाठी-भेटी देऊन, कामाला सुरुवात करतील. ‘भावी मुख्यमंत्री’ या चर्चेला पुन्हा बळ द्यायचे असेल, तर अजित पवार यांना विधानसभेत ‘आपले नाणे खणखणीत वाजतेय’ हे दाखवून देण्याची हीच वेळ असेल.