Ajit Pawar: पोर्शे प्रकरण दाबायचा प्रयत्न नाही, आरोप बिनबुडाचे, अजितदादा टिंगरेंच्या पाठीशी ठाम

पुणे: कोणीही आरोपींना पाठिशी घालण्याचं काम केलेलं नाही, आमदार सुनील टिंगरे यांच्यावर होत असेलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण आपल्या आमदाराच्या पाठिशी ठाम असल्याचं दाखवून दिलं. त्यांनी माध्यमांशी बोलताना पोर्शे कार अपघात प्रकरणात आतापर्यंत काय-काय झालं आणि सरकार हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेत असल्याचं स्पष्ट केलं आहे.

पुणे पोर्शे अपघातात सरकार गंभीर, दोषींवर कारवाईच्या सूचना – अजित पवार

जेव्हा ही घटना घडली तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: पुण्यात आले, त्यांनी याप्रकरणाची माहिती घेऊन पोलिस खात्याला सक्त सूचना दिली होती की बारकाईने चौकशी करावी. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याप्रकणाची माहिती घेत चौकशीचे आदेश दिले होते. पालकमंत्री या नात्याने मी देखील तशा सूचना दिल्या होत्या.

चौकशी सुरु झाल्यानंतर, अनेकांचा यामध्ये सहभाग असल्याचं समोर आलं. सुरुवातीला जो जामीन देण्यात आला होता. सरकार जामीन देत नाही कोर्ट देतं, कोर्टाने एखादा निर्णय दिल्यानंतर आपण ते मान्य करतो. त्याबाबत मी काहीही बोलणार नाही. या घटनेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर तपासाची चक्र फिरताच आणि जेव्हा ही घटना घडली त्यानंतर काय-काय झालं, गुन्हा कधी दाखल झाला, जेव्हा आयुक्तांना याबाबत माहित झालं तेव्हा त्यांनीही यात लक्ष घातलं आणि ज्या दोन पोलिसांनी या कारवाईत दिरंगाई केली, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, ससून रुग्णालयातील काही जण दोषी आढळले त्यांच्यावर कारवाई झाली. मंत्री हसन मुश्रीफ आणि मंत्री शंभूराज देसाई यांनीही त्यांच्या त्यांच्या विभागातील दोषींवर कारवाई केली आहे. याबाबत सरकार गंभीर आहे, त्याबाबतची कारवाई सुरु आहे, जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.

सारखे सारखे कॅमेरासमोर येत नाही, म्हणजे लपवाछपवी सुरु आहे असं नाही – अजित पवार

आम्ही सारखे सारखे कॅमेरासमोर येत नाही याचा अर्थ असा नाही की कोणालातरी लपवाछपवी करायचं काम सुरु आहे, असं अजिबात नाही. विरोधकांनी कशाप्रकारे विरोध करावा याबाबत मी काहीही बोलू इच्छित नाही. ही घटना घडल्यापासून आजपर्यंत जो कोणी दोषी आढळत आहे, त्याप्रकारे कारवाई सुरु आहेत.

त्यांच्या भागात जर काही घडलं, तर आमदाराला रात्री अपरात्री तिथे जावं लागतं. गेल्यावेळी सुनील टिंगरेंच्या भागात स्लॅब कोसळलं होतं, काहीजणांचा मृत्यू झाला होता. तात्काळ तो तिथे पोहोचला आणि लोकप्रतिनिधी म्हणून जे करायचं त्याने केलं. पुण्यात काही झालं की हे लोकप्रतिनिधी तात्काळ आपल्या कार्यकर्त्यांसह तिथे पोहोचतात आणि मदत करतात, चौकशी करतात. ही घटना रात्री उशीरा घडली, रात्री त्यांना फोन आला आणि ते पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. तिथे सगळं बघितल्यानंतर त्याने कोणालाही पाठिशी घाला असं काहीही सांगितलं नाही. सुनील टिंगरे यांनी प्रकरण दाबायचं प्रयत्न केला का? सुनील टिंगरेंवर होणारे आरोप बिनबुडाचे आहेत.

आता काहीजण तर माझ्यावर घसरले आहेत. मी तर माझा कार्यकर्त्या चुकला तर मी स्वत: सांगतो की संबंधितांना टायरमध्ये घ्या आणि कारवाई करा. शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या कानावर प्रकरण आल्यानंतर असं कोणी केलं का की हे प्रकरण दाबायचं प्रयत्न केला, घटना घडल्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना कारवाई करु दिली नाही, असं काहीही झालं नाही. याप्रकणात काही विभागाच्या लोकांनी चुका केल्या, त्यांच्यावर जी कारवाई करायला हवी होती, ती केलेली आहे.