अजित पवारांचा बारामती दौरा असतो. त्यावेळी वेळ मिळेल तेव्हा अगदी रात्री उशिरा देखील किंवा भल्या पहाटे व सकाळी अजित पवार हे विकासकामांची पाहणी करतात. त्यानंतर ते नागरिकांना भेटत असतात. लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यभरातील विविध मतदारसंघातील प्रचार सभांचा व्यस्त दौरा असल्याने अजित पवार हे बारामतीत आले नव्हते.
सात मे नंतर ते आज बारामतीत आले आहेत. त्यांनी नेहमीप्रमाणे आज सकाळी विविध विकासकामांची पाहणी केली. त्यानंतर सहयोग निवासस्थानी त्यांनी नागरिकांचा जनता दरबार घेतला. या जनता दरबारात नेहमीप्रमाणे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून निवेदन दिली. यावेळी जी कामे तातडीने हाताबाहेर करणे शक्य आहे, त्याचा निपटारा अजित पवारांनी जागीच केला.
चर्चेला पूर्णविराम…
शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या अंतिम सभेनंतर अजित पवार महायुतीच्या प्रचारसभेमध्ये फारसे दिसले नाही. त्यामुळे ते नॉटरिचेबल आहेत. अशी चर्चा रंगली. प्रसार माध्यमांमध्ये त्याची चर्चा झाली, तेव्हा अजित पवार हे आजारी असल्याची माहिती पक्षाच्या प्रवक्त्यांनी देखील दिली. त्यानंतर मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील संयुक्त सभेत अजित पवारांनी भाषण केलं आणि त्यानंतर अजित पवार आजारी असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला.