राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे शहरात आहे. शुक्रवारी पुण्यात त्यांनी पुणे जिल्ह्यासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीला पुणे जिल्ह्यातील २३ आमदार उपस्थित होते. बैठकीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आयुक्तांच्या बाबत तक्रारी आहेत? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर अजित पवार संतापले. आतमध्ये बैठकीत मी काय केले, हे तुम्हाला सांगण्यास मी बांधील नाही. बैठकीतील त्या गोष्ट आहेत. मला जे कारायचे होते, ते मी केले आहे. राज्य सरकारच्या प्रत्येक पैसा योग्य पद्धतीने खर्च करण्याची खबरदारी आमची आहे. त्याला अधिकाऱ्यांनीही सहकार्य केले पाहिजे. काम न करणाऱ्यांसाठी आम्ही निर्णय घेतले आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.
पुणे जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांची अजित पवार यांनी माहिती दिली. ते म्हणाले, बैठकीला १३ तालुक्यातील आणि दोन्ही शहरांतील २१ आमदारांनी भाग घेतला. पुणे जिल्ह्यातील रस्ते तीन वर्षांत पूर्ण केले जातील. तसेच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती. त्यात गाळ काढण्यासाठी रॉयल्टी न लावण्याचा निर्णय घेतला होता. तो शेतांमध्ये टाकावा, असे म्हटले होते. त्यानुसार कामे केली जातील.
आरोग्याचा विषयावर बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण समाजाच्या मनावर जखम झाली आहे. ही घटना म्हणजे आरोग्य यंत्रणांमध्ये त्रुटी असल्याचे स्पष्ट करणारी आहे. त्याची उच्चस्तरीय चौकशी सुरू झाली आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. त्या महिलेला न्याय मिळेल. सरकारने त्यासाठी ठोस निर्णय घेतले आहे.
पुण्यातील विकास कामांची अजित पवार यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, ससूनला हवा तो निधी दिला जात आहे. पुण्यात प्रशासकीय इमारती कमी आहे, म्हणून अनेक ठिकाणी कामे सुरू आहेत. पोलिस आयुक्तालय काम सुरू आहे. १९३ कोटी रुपये त्यासाठी दिले आहे. ६२ कोटी रुपये खर्च करुन एसपी कार्यालयाचे काम सुरू आहे. ८०० कोटी रुपये खर्च करून यशदा कार्यालयाची उभारणी केली जात आहे.