अजितदादा, शरद पवार पुन्हा एकत्र येणार? मविआतील बड्या नेत्याचं सूचक वक्तव्य

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत युतीसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्राच्या हितापुढे आमची भांडणं, वाद ही किरकोळ गोष्ट असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरे यांच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच आता दोन्ही पवार देखील पुन्हा एकत्र येणार का? अशी देखील चर्चा सुरू झाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले देसाई? 

काहीही होऊ शकतं, अशक्य असं काहीच नाही. काही गोष्टी आणि बदल हे सतत होत असतात. पक्षाचे दोन भाग होतात दोन भाग पुन्हा एकत्र येतात. पुढचा काळ हा अतिशय उलथापालथीचा काळ आहे, अनेक घडामोडी घडू शकतात. पण महाराष्ट्राच्या हितासाठी जर घडामोडी घडत असतील तर त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. दोघांचं पुन्हा मनोमिलन कसं होतं हे बघायला महाराष्ट्र उत्सुक आहे. आम्ही सुद्धा उत्सुक आहोत, असं सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीसंदर्भात देखील प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्याची भूमिका बोलून दाखवली, आणि त्याला उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन काम करायला आवडेल असे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आपापल्या पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांच्या मागे कार्यकर्त्यांच्या फौजा आहेत. दोन्ही पक्ष जर एकत्र येत असतील, तर त्यामुळे महाराष्ट्राला नक्कीच आनंद होईल.  चांगलं वातावरण आहे, महाराष्ट्राला दिलासा मिळेल, असं सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे. ते जळगावमध्ये बोलत होते.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)