Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या रोखठोक स्वभावामुळे महाराष्ट्रभर ओळखले जातात. शासकीय अदिकाऱ्यांकडून कामात काही कसूर राहिला की कशाचीही भिडभाड न पाहता, ते संबंधित अधिकाऱ्याला फैलावर घेतात. अजितदादांचे तसे अनेक व्हिडीओ याआधी व्हायरल झालेले आहेत. अजितदादा रोखठोक आणि कडक स्वभावाचे आहेत, असं म्हटलं जात असलं तरी त्यांची विनोदबुद्धीदेखील तेवढीच प्रभावी आहे. एखाद्या विषयावर बोलताना ते शब्दांचा चपखल वापर करून गंभीवर वातावरणात हशा पिकवताना दिसतात. सध्या अजित पवार यांनी असेच एक मजेदार भाष्य केले आहे. पुण्यात एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा उल्लेख करून मोठं मिश्किल विधान केलंय.
अजित पवारांनी उल्लेख केला ‘मी पुन्हा येईन’
अजित पवार यांच्या या विधानानंतर सभागृहात एकच हशा पिकला होता. ते एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. यावेळी बोलत असताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मी पुन्हा येईन’ या प्रसिद्ध वाक्याचा उल्लेख केला. विशेष म्हणजे मी देवेंद्र फडणवीसांना मी पुन्हा येईन, या नावाचे एक पुस्तकही लिहायला सांगणार आहे, असे अजित पावर हसत हसत म्हणाले.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
“ऐकलं का? हे पुस्तक केवळ वाचायला नव्हे तर विचार करायला लावणारे आहे, याची मला खात्री आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘अर्थसंकल्प कसा समजून घ्यावा’ हे पुस्तक लिहिलेले आहे. तेव्हा ते विरोधी पक्षनेते होते. मी आता त्यांना दुसरं एक पुस्तक लिहायला सांगणार आहे. मुंबईत गेलो की त्यांना ‘मी पुन्हा येईन’ हे पुस्तक लिहायला सांगणार आहे,” असे मिश्किल भाष्य अजित पवार यांनी केले आहे. त्यांच्या या विधानानंतर सभागृहात एकच हशा पिकला.
फडणवीसांकडून अनेकदा ‘मी पुन्हा येईनचा उल्लेख’
दरम्यान, 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष म्हणून नावारुपाला आला होता. मात्र सर्वांत मोठा पक्ष असूनही भाजपाला सत्ता स्थापन करता आली नव्हती. ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते. त्यानंतर फडणवीस यांना विरोधी बाकावर बसावे लागले. याच काळात विरोधी पक्षात असताना त्यांनी विधिमंडळात भाषण करताना, वेगवेगळ्या कार्यक्रमांत तसेच निवडणुकीत प्रचार करताना ‘मी पुन्हा येईन’ हे विधान अनेकदा केले होते. त्यांचे हेच विधान नंतर चांगलेच गाजले. महाविकास आघाडीचे नेते फडणवीस यांना याच वाक्यावरून डिवचायचे.