मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर यांच्या सहकार्याने हा उपक्रम हाती घेण्यात आला असून, कृषी क्षेत्रात आधुनिकता आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या स्टार्टअप्स उद्योगांना निधी दिला जाणार आहे.
या उपक्रमाची प्रक्रिया सुरू झाली असून, ‘एमसीसीआयए’कडून अशा स्टार्टअप्सना आवाहन केले जात आहे. अजिंक्य रहाणे महाराष्ट्राचा भूमीपुत्र असून, तो एका शेतकरी कुटुंबातून पुढे आला आहे. क्रिकेट सामन्यांतील कामगिरीप्रमाणेच कृषी क्षेत्रातही मोठी कामगिरी करण्याचा त्याचा मानस असून, शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारचे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या उद्योगांना चालना देण्यासाठी अजिंक्य मैदानात उतरला आहे. यात कृषी तंत्रज्ञान तयार करणाऱ्या, निर्यातीसंदर्भातील साखळी विकसित करणाऱ्या, कृषी उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या; तसेच अत्याधुनिक बी-बियाणे आणि कृषीविषयक साधने विकसित करणाऱ्या स्टार्टअप्सच्या अनोख्या संकल्पनांना या उपक्रमातून बळ दिले जाईल. यासाठी ‘एमसीसीआयए’कडून अर्ज दाखल करून घेतले जात असून, तेथेच संपर्क साधून इच्छुकांना अर्ज करता येणार आहे. या अर्जांची छाननी करून योग्य त्या स्टार्टअप्सची निवड या निधीसाठी केली जाईल, असे ‘एमसीसीआयए’कडून स्पष्ट करण्यात आले आहे.
अर्जांच्या छाननीनंतर निवड
अजिंक्य रहाणेची गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत होईल, असा उपक्रम हाती घेण्याची इच्छा होती. त्यासाठी ‘एमसीसीआयए’बरोबर अनेक बैठका झाल्यानंतर हा उपक्रम अस्तित्वात आल्यानंतर त्यासाठी अर्जही यायला सुरुवात झाली. लवकरच या अर्जांची छाननी करून स्टार्टअप्सची निवड केली जाईल, असे ‘एमसीसीआयए’कडून स्पष्ट करण्यात आले आहे.
असा आहे उपक्रम
१. शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादने विकसित करणाऱ्या स्टार्टअप्सच्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी निधी उपलब्ध होणार.
२. पुणे जिल्हा; तसेच राज्यातील अशा स्टार्टअप्सने ‘एमसीसीआयए’कडे अर्ज करणे आवश्यक.
३. अर्जांची छाननी करून निवड केलेल्या स्टार्टअप्सना निधी मिळू शकेल.
४. या निधीद्वारे स्टार्टअप्सने त्यांच्या संकल्पनांवर संशोधन आणि प्रत्यक्ष निर्मिती करावी लागेल.
५. पुढील काही महिन्यांत ही निवड प्रक्रिया पूर्ण होईल.
अजिंक्य रहाणे आणि काही उद्योजक एकत्र येऊन ‘अजिंक्य रहाणे अँड असोसिएट्स’ या नावाने हा उपक्रम हाती घेत आहेत. ‘एमसीसीआयए’च्या सहकार्याने अशा स्टार्टअप्सचा शोध घेतला जात असून, अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. लवकरच या स्टार्टअप्सची निवड केली जाईल.- प्रशांत गिरबने, महासंचालक, एमसीसीआयए